29 नॅनो उपग्रहांच्या प्रक्षेपणातून इस्त्रोने कमावले 61 लाख युरो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2017 02:11 PM2017-07-21T14:11:37+5:302017-07-21T14:14:08+5:30
इस्त्रोची व्यावसायिक शाखा असलेल्या अँट्रीक्सने 14 देशांच्या 29 नॅनो उपग्रहांच्या प्रक्षेपणातून 61 लाख युरोंची कमाई केली आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 21 - भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्त्रोची व्यावसायिक शाखा असलेल्या अँट्रीक्सने 14 देशांच्या 29 नॅनो उपग्रहांच्या प्रक्षेपणातून 61 लाख युरोंची कमाई केली आहे. मागच्या चारवर्षात अँट्रीक्सने परदेशी उपग्रहाच्या प्रक्षेपणातून 1 कोटी 57 लाख युरोची कमाई केली आहे. 2017 सालच्या पहिल्या सहा महिन्यात इस्त्रोने 130 उपग्रहांचे प्रक्षेपण केले आहे. इस्त्रोने जे परदेशी उपग्रह प्रक्षेपित केले ते आकाराने छोटे होते.
पुढच्या काहीवर्षात इस्त्रो उपग्रहांच्या लाँचिंगसाठी अँट्रीक्सला दोन स्वतंत्र प्रक्षेपक उपलब्ध करुन देईल असा विश्वास इस्त्रोचे चेअरमन एएस किरण कुमार यांनी व्यक्त केला. सध्या भारतीय उपग्रहांचे प्रक्षेपण ही इस्त्रोची पहिली प्राथमिकता आहे. त्यामुळे प्रक्षेपकांमध्ये जी अतिरिक्त जागा उरते ती परदेशी उपग्रहांसाठी राखून ठेवली जाते. याच अतिरिक्त जागेतून अँट्रीक्स नफा कमवत आहे.
इस्त्रोने अलीकडे कार्टोसॅट-2 उपग्रहाचे प्रक्षेपण केले. यावेळी प्रक्षेपकामध्ये कार्टोसॅट मुख्य प्रवाशी तर, अन्य परदेशी उपग्रह सहप्रवासी होते. ऑस्ट्रीया, चिली, बेल्जियम, फ्रान्स, फिनलँड, झेक प्रजासत्ताक, जर्मनी, इटली, अमेरिका, लाटीवा, स्लोव्हाकिया आणि यूके या देशांचे नॅनो उपग्रह होते.
आणखी वाचा
2013 मध्ये परदेशी उपग्रहाच्या लाँचिंगमधून अँट्रीक्सने 69 लाख युरोंची कमाई केली. परदेशी उपग्रहाच्या लाँचिंगमधून सरासरी 10 ते 20 टक्के महसूल मिळतो. जवळपास 80 टक्के महसूल दुस-या स्त्रोतांमधून मिळतो. सॅटलाइट कम्युनिकेशनच्या बिझनेसमधून सर्वाधिक फायदा मिळतो.
लवकरच इस्त्रो रॉकेलला इंधन बनवून करणार उपग्रहाचे प्रक्षेपण
भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्त्रो सेमी क्रायोजेनिक इंजिनच्या निर्मितीवर काम करत असून, या इंजिनमध्ये पर्यावरणपूरक रॉकेलचा इंधन म्हणून वापर करण्यावर शास्त्रज्ञ काम करत आहेत. द्रवरुप इंधनापेक्षा रॉकेल हलके असल्यामुळे सामान्य तापमानाला ते साठवून ठेवता येऊ शकते. सध्या उपग्रह प्रक्षेपणासाठी वापरल्या जाणा-या रॉकेटच्या इंजिनमध्ये द्रवरुप हायड्रोजन आणि ऑक्सिजनच्या मिश्रणाचा इंधन म्हणून वापर केला जातो. हे इंधन गोठवून टाकणा-या (-253) डीग्री सेल्सिअस तापमानाला साठवून ठेवावे लागते.