मॉब लिंचिंगवरून देशातील प्रतिभावंत आमने-सामने, पंतप्रधानांना पत्र लिहिणाऱ्यांना 61 जणांकडून प्रत्युत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2019 12:00 PM2019-07-26T12:00:58+5:302019-07-26T12:05:04+5:30
देशातील सद्यस्थितीवरून प्रतिभावंतांच्या वर्गामध्ये दोन गट पडले आहे.
नवी दिल्ली - देशातील सद्यस्थितीवरून प्रतिभावंतांच्या वर्गामध्ये दोन गट पडले आहे. मॉब लिंचिंगसारख्या घटना आणि श्रीरामाचे नाव घेत होत असलेल्या हिंसाचारावरून संताप व्यक्त 49 प्रतिभावंतांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहीत संताप व्यक्त केला होता. मात्र आता या 49 प्रतिभावंतांना 61 प्रतिभावंतांनी खुले पत्र लिहून प्रत्युत्तर दिले आहे.
हे खुले पत्र लिहिणाऱ्यांमध्ये अभिनेत्री कंगना राणौत, गीतकार प्रसून जोशी, शास्त्रीय नृत्यांगना सोनल मानसिंह यांच्यासह 61 जणांचा समावेश आहे. जेव्हा आदिवासींना माओवादी लक्ष्य करतात, तेव्हा तुम्ही गप्प का बसता? असा सवाल या प्रतिभावंतांनी पंतप्रधानांना पत्र लिहिणाऱ्या 49 प्रतिभावंतांना केला आहे. तसेच त्यांच्या ठरावीक बाबींवर चिंता करण्याच्या वृत्तीवर टीका केली आहे.
The 61 personalities who have written an open letter against 'selective outrage and false narratives'. pic.twitter.com/Fdeac3KCri
— ANI (@ANI) July 26, 2019
दरम्यान, दरम्यान, देशभरात वाढत असलेल्या मॉब लिंचिंगच्या घटनांमुळे व्यथित झालेल्या विविध क्षेत्रातील 49 मान्यवरांनी एकत्र येत पंतप्रधान नरेंद्र मोदींनापत्र लिहिले होते, या पत्रांमध्ये मॉब लिंचिंगच्या वाढत्या घटनांबाबत चिंता व्यक्त करण्यात आली होती. तसेच देशात असंतोषाचे दमन होणार नाही असे वातावरण निर्माण करण्याची विनंती या मान्यवरांनी नरेंद्र मोदींना केली होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिणाऱ्या मान्यवरांमध्ये मणिरत्नम, अडूर गोपालकृष्णन, रामचंद्र गुहा, अनुराग कश्यप यांच्यासह कला, साहित्य आणि सामाजिक क्षेत्रातील 49 जणांचा समावेश होता. देशामध्ये निर्माण होणाऱ्या असंतोषाचे दमन न होता त्याला मोकळी वाट मिळेल, असे वातावरण निर्माण करावे, अशी विनंती या पत्राच्या माध्यमातून पंतप्रधानांना करण्यात आली होती.
तसेच जय श्रीराम हे आज भडकवणारे वाक्य बनले आहे. श्रीराम हे बहुसंख्याक समुदायासाठी पवित्र आहेत. त्यामुळे राम नामाचे राजकारणबंद करावे. देशभरात दलितांवरील अत्याचाराच्या 840 घटना घडल्या आहेत. यावर काय कारवाई झाली याचे उत्तर पंतप्रधानांनी द्यावे, अशी विचारणाही या पत्राच्या माध्यमातून करण्यात आली होती.