"तृणमूलचे ६२ आमदार भाजपाच्या संपर्कात, पंधरा दिवसात ममता बॅनर्जी सरकार पडणार’’
By बाळकृष्ण परब | Published: November 30, 2020 01:20 PM2020-11-30T13:20:43+5:302020-11-30T13:29:42+5:30
Mamata Banerjee News : गेल्या दहा वर्षांपासून राज्यात सत्तेवर असलेल्या ममत बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसला फुटीचे ग्रहण लागले असून, काही बड्या नेत्यांसह अनेक आमदार पक्षाला सोडचिठ्ठी देत आहेत.
कोलकाता - पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागल्यापासून राज्यात फोडाफोडीच्या आणि पक्षांतराच्या राजकारणाला जोर आला आहे. गेल्या दहा वर्षांपासून राज्यात सत्तेवर असलेल्या ममत बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसला फुटीचे ग्रहण लागले असून, काही बड्या नेत्यांसह अनेक आमदार पक्षाला सोडचिठ्ठी देत आहेत. त्यातच आता ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील सरकारबाबतही अनेक दावे केले जात आहेत. तृणमूल काँग्रेसचे ६२ आमदारा आमच्या संपर्कात असून, येत्या १५ डिसेंबरपर्यंत ममत सरकार पडणार असल्याचा दावा भाजपाचे खासदार सौमित्र खान यांनी केला आहे.
सौमित्र खान म्हणाले की, ह्यतृणमूल काँग्रेसचे ६२ आमदार आमच्या संपर्कात आहेत. ते कधीही पक्ष बदलू शकतात. आम्ही १५ डिसेंबरपर्यंत तृणमूल काँग्रेसमध्ये फूट पाडणार आहोत. अशा परिस्थितीत ममता बॅनर्जी यांना सरकार चालवणे कठीण जाणार आहे.ह्ण दरम्यान, सध्या ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील सरकारकडे स्पष्ट बहुमत आहे.
सौमित्र खान यांनी कालही ममता बॅनर्जी सरकार अस्थिर झाल्याचा दावा केला होता. राज्यपाल जगदीप धनखड हे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना राज्याच्या विधानसभेत बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दे शकतात, असा दावा केला होता. काल एका कार्यक्रमात बोलताना सौमित्र खान यांनी हा दावा केला होता.
"ममतांना बहुमत सिद्ध करण्यास सांगू शकतात राज्यपाल"
काही दिवसांपूर्वी ममता बॅनर्जी सरकारमधील बलाढ्य मंत्री शुभेंदू अधिकारी यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यापासून ममता सरकार अस्थिर झाल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. शुभेंदू अधिकारी हे आता तृणमुल काँग्रेस सोडून भाजपामध्ये दाखल होतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे. हा ममता बॅनर्जी आणि तृणमूल काँग्रेससाठी मोठा धक्का ठरू शकतो. शुभेंदू अधिकारी हे मिदनापूरमधील बलाढ्य नेते आहेत. तसेच आजूबाजूच्या जिल्ह्यांमध्ये त्यांचा चांगला प्रभाव आहे.
दरम्यान, भाजपाने तृणमूलचे ६२ आमदार आपल्या संपर्कात असल्याचा दावा करून पश्चिम बंगालमधील वातावरण तापवले आहे. मात्र भाजपाचेच तीन ते चार खासदार आणि काही नेते तृणमूलच्या संपर्कात असल्याचा दावा करून तृणमूल काँग्रेसने भाजपाला प्रत्युत्तर दिले आहे. मात्र भाजपाकडून यावर अद्याप प्रतिक्रिया जाहीर करण्यात आलेली नाही.