६३ बड्या उद्योगपतींना कर्जमाफी
By admin | Published: November 17, 2016 05:03 AM2016-11-17T05:03:49+5:302016-11-17T07:07:21+5:30
देशातील सर्वांत मोठी बँक असलेल्या स्टेट बँक आॅफ इंडियाने ६३ बड्या उद्योगपतींना ७ हजार कोटी रुपयांचे कर्ज माफ केले आहे.
नवी दिल्ली : देशातील सर्वांत मोठी बँक असलेल्या स्टेट बँक आॅफ इंडियाने ६३ बड्या उद्योगपतींना ७ हजार कोटी रुपयांचे कर्ज माफ केले आहे. विशेष म्हणजे या सर्व कारखानदारांनी हेतूत: कर्ज थकवले होते. त्यांना रिझर्व्ह बँकेच्या परवानगीने ‘अॅडव्हान्स अंडर कलेक्शन अकाउंट’ (औका) सुविधेअंतर्गत कर्जमाफी देण्यात आल्याचे आरोप केले जात आहेत.
नरेंद्र मोदी सरकारने देशातील काळ्या पैशाविरुद्ध मोहीम उघडण्याच्या नावाखाली पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर अवघ्या आठवडाभरात बड्या उद्योगपतींना कर्जमाफी दिल्याची माहिती समोर आली आहे. दैनंदिन खर्चापुरते पैसे मिळावे म्हणून लोक देशभरात बँकांसमोर रांगा लावून उभे असताना बडे कारखानदार मात्र आधीच हजारो कोटींची कर्जमाफी मिळवून बसले आहेत.
कर्ज मिळालेले हे कारखानदार ‘टॉप-१00’ थकबाकीदारांच्या यादीत होते. यापैकी ६३ उद्योगपतींना बँकेने संपूर्ण कर्जमाफी दिली आहे. ३१ उद्योगपतींना अंशत: कर्जमाफी दिली आहे, तर उरलेल्या ६ जणांकडील कर्ज बुडीत कर्जाच्या (एनपीए) यादीत घातले आहे. ३0 जून २0१६ पर्यंत बड्या उद्योगपतींना ४८ हजार कोटींची कर्जमाफी बँकेने दिली आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
टॉप-५ उद्योगांना मिळालेली कर्जमाफी-
किंगफिशर एअर लाइन्स -ही कंपनी विदेशात फरार झालेला उद्योगपती विजय मल्ल्या याच्या मालकीची आहे. कंपनीकडे १७ बँकांचे ६,९६३ कोटी रुपये थकले होते. त्यापैकी १,२0१ कोटी रुपये एसबीआयचे होते. ते आता माफ झाले आहेत. सहेतुक कर्ज बुडव्यांच्या यादीत मल्ल्या सर्वोच्च स्थानी आहे. कर्जमाफीनंतर थकबाकीदारांच्या यादीतून त्याचे नाव हटविले आहे.
जीईटी पॉवर : ही कंपनी अजय कुमार विष्णोई यांच्या मालकीची आहे. २0१६ मध्ये ती कर्जबुडव्यांच्या यादीत आली होती. आर्थिक गैरव्यवहार व प्रकल्पांना उशीर यामुळे कंपनी तोट्यात गेली होती.
केएस आॅईल : कलश आणि डबल शेर या नावाने खाद्य तेल बनविणारी ही कंपनी २0१३ मध्ये एनपीएमध्ये गेली होती. कंपनीच्या पाच कारखान्यांचा लिलाव करण्याचा प्रयत्न बँकेने केला होता, पण गिऱ्हाईकच न मिळाल्याने तो बारगळला.
साई इन्फो सिस्टीम : सुनील कक्कड यांच्या मालकीच्या साई इन्फो कंपनीला २६ आॅगस्ट २0१६ रोजी सहेतुक कर्जबुडवी कंपनी घोषित केले होते. कक्कड विदेशात फरार झाले होते. त्यांना भारतात आणून अटक करण्यात आली होती. तथापि, नंतर ते जामिनावर मुक्त झाले.