चिंताजनक! पृथ्वीवरील १०० सर्वाधिक प्रदूषित ठिकाणांपैकी ६३ शहरं एकट्या भारतात, वर्ल्ड एअर क्वालिटी रिपोर्टमध्ये खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2022 07:14 PM2022-03-22T19:14:54+5:302022-03-22T19:15:32+5:30

स्विस फर्म आयक्यूएअरनं (IQAir) जारी केलेल्या जागतिक वायू गुणवत्ता रिपोर्टनुसार (World Air Quality Report) २०२१ मध्ये भारतातील वायुप्रदूषणाचा स्तर आणखी वाढला आहे.

63 indian cities out of 100 most polluted places on earth revealed in world air quality report | चिंताजनक! पृथ्वीवरील १०० सर्वाधिक प्रदूषित ठिकाणांपैकी ६३ शहरं एकट्या भारतात, वर्ल्ड एअर क्वालिटी रिपोर्टमध्ये खुलासा

चिंताजनक! पृथ्वीवरील १०० सर्वाधिक प्रदूषित ठिकाणांपैकी ६३ शहरं एकट्या भारतात, वर्ल्ड एअर क्वालिटी रिपोर्टमध्ये खुलासा

Next

नवी दिल्ली- 

स्विस फर्म आयक्यूएअरनं (IQAir) जारी केलेल्या जागतिक वायू गुणवत्ता रिपोर्टनुसार (World Air Quality Report) २०२१ मध्ये भारतातील वायुप्रदूषणाचा स्तर आणखी वाढला आहे. त्यामुळे गेल्या तीन वर्षांत हवेची गुणवत्ता सुधारण्याचा ट्रेंड संपुष्टात आला आहे. प्राणघातक आणि सूक्ष्म PM2.5 प्रदूषकांमध्ये मोजलेले सरासरी वायू प्रदूषण 58.1 मायक्रोग्राम प्रति घनमीटर इतका आहे. हा आकडा जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) हवेच्या गुणवत्तेच्या मार्गदर्शक तत्त्वापेक्षा १० पट अधिक आहे. जगातील 100 सर्वाधिक प्रदूषित ठिकाणांच्या यादीत 63 भारतातील शहरं आहेत. यापैकी निम्म्याहून अधिक ठिकाणं हरियाणा आणि उत्तर प्रदेशात आहेत. धक्कादायक बाब अशी की भारतातील कोणतंही शहर WHO च्या मानकांची पूर्तता करू शकलं नाही.

अहवालानुसार, उत्तर भारतातील परिस्थिती आणखी वाईट आहे. राजधानी दिल्ली ही सलग दुसऱ्या वर्षी जगातील सर्वात प्रदूषित राजधानी ठरली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत दिल्लीतील प्रदूषणात सुमारे 15 टक्क्यांनी वाढ झाली आहे. येथे वायू प्रदूषणाची पातळी डब्ल्यूएचओ सुरक्षा मर्यादेपेक्षा जवळजवळ 20 पट जास्त होती, वार्षिक सरासरी पीएम 2.5 96.4 मायक्रोग्रॅम प्रति घनमीटर इतकी आहे. तर सुरक्षित मर्यादा ५ इतकी आहे. दिल्लीच्या वायू प्रदूषणात जागतिक स्तरावर चौथ्या क्रमांकावर असल्याचं अहवालात म्हटलं आहे. मात्र, जगातील सर्वात प्रदूषित ठिकाण म्हणजे राजस्थानमधील भिवाडी. यानंतर दिल्लीच्या पूर्व सीमेवर उत्तर प्रदेशचे गाझियाबादचा नंबर लागतो. टॉप 15 सर्वाधिक प्रदूषित शहरांपैकी 10 भारतातील आहेत आणि बहुतेक शहरं राजधानीच्या आसपासची आहेत.

शिकागो विद्यापीठाने तयार केलेल्या हवेच्या गुणवत्तेचा 'लाइफ इंडेक्स' सूचित करतो की दिल्ली आणि लखनौचे रहिवासी जर शहरानं WHO च्या मानकांनुसार हवेच्या गुणवत्तेची पातळी राखली तर त्यांच्या अपेक्षित आयुष्यात आणखी दहा वर्षांची भर घालू शकतात. 'IQAir'च्या सध्याच्या आकडेवारीवर टिप्पणी करताना, ग्रीनपीस इंडियाचे मोहीम व्यवस्थापक अविनाश चंचल म्हणाले की, हा अहवाल सरकार आणि कॉर्पोरेशनसाठी डोळे उघडणारा आहे. 'लोक धोकादायक प्रदूषित हवेत श्वास घेत असल्याचं यावरून पुन्हा एकदा सिद्ध होतं. शहरांच्या हवामानात PM-2.5 कणांच्या प्रचंड उपस्थितीसाठी वाहनांचं उत्सर्जन हे एक प्रमुख घटक आहे. केवळ तीन देशांनी ते पूर्ण केलं', असंही अहवालात नमूद करण्यात आलं आहे. 

वायू प्रदूषणाच्या प्रमुख स्त्रोतांमध्ये वाहनांमधून निघणारा धूर, कोळशावर चालणारे ऊर्जा प्रकल्प, औद्योगिक कचरा, स्वयंपाकासाठी केलं जाणारं ज्वलन आणि बांधकाम क्षेत्र यांचा समावेश होतो. खरंतर, गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये, पहिल्यांदाच दिल्लीच्या आसपासचे अनेक मोठे ऊर्जा प्रकल्प तसेच अनेक उद्योग वायू प्रदूषणाच्या तीव्र पातळीमुळे बंद पडले होते. भारतासाठी या संकटाचा आर्थिक खर्च वार्षिक $150 अब्ज पेक्षा जास्त असल्याचा अंदाज आहे. हृदय आणि फुफ्फुसाचे आजार आणि इतर अनेक गंभीर परिणाम वायू प्रदुषणामुळे होतात. वायू प्रदूषणाशी संबंधित दरमिनिटामागे अंदाजे तीन मृत्यू होतात आणि ही आकडेवारी अतिशय वाईट आहे. 

Web Title: 63 indian cities out of 100 most polluted places on earth revealed in world air quality report

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.