निस्वार्थ सेवेची बक्षिसी! वृद्ध महिलेनं रिक्षा चालकाच्या नावे केलं ३ मजली घर अन् संपूर्ण संपत्ती
By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2021 12:43 PM2021-11-14T12:43:58+5:302021-11-14T12:44:11+5:30
रिक्षाचालक गेल्या २५ वर्षांपासून करत असलेल्या सेवेप्रती व्यक्त केली कृतज्ञता
संपत्ती नव्हे, तर मानवता हेच सगळ्यात मोठं धन असतं असं म्हणतात. वेळेला माणसं आधी कामी येतात. वेळेला धावणारी माणसंच सोबत नसतील तर संपत्तीचा काय उपयोग? ओदिशातील एका वृद्ध महिलेनं तिच्या कृतीमधून हाच संदेश दिला आहे. कटक जिल्ह्यात वास्तव्यास असलेल्या मिनाती पटनायक यांनी निस्वार्थ भावनेनं त्यांची सेवा करणाऱ्या रिक्षाचालकाला स्वत:ची सर्व संपत्ती देण्याचा निर्णय घेतला आहे.
रिक्षाचालकाला संपत्ती देऊ नका, असा सल्ला मिनाती यांना त्यांच्या कुटुंबियांनी दिला. मात्र त्या स्वत:च्या निर्णयावर ठाम राहिल्या. मिनाती यांचं तीन मजली घर, दागिने आणि घरातील अन्य वस्तूंचं एकूण मूल्य जवळपास १ कोटी रुपये इतकं आहे. मिनाती सध्या ६३ वर्षांच्या आहेत. त्या कटक जिल्ह्यातल्या सुताहटामध्ये राहतात.
गेल्या वर्षी मिनाती यांच्या पतीचं निधन झालं. त्यानंतर त्या मुलीकडे राहू लागल्या. मात्र पतीच्या निधनानंतर अवघ्या ६ महिन्यांत मुलीलाही मृत्यूनं गाठलं. या कठीण प्रसंगी मिनाती यांना कुटुंबानं एकटं टाकलं. यावेळी रिक्षाचालक बुद्धा सामल आणि त्यांच्या कुटुंबानं निस्वार्थ भावनेनं मिनाती यांची काळजी घेतली. सामल आणि त्याच्या कुटुंबानं मिनाती यांचा एकटेपणा दूर केला. त्यांचं आजारपण, औषधं या सगळ्या गोष्टींकडे सामल यांनी लक्ष दिलं.
मिनाती यांनी स्वत:ची संपूर्ण संपत्ती सामल यांच्या नावावर करण्याचा निर्णय घेतला आहे. माझ्या निधनानंतर संपत्तीवरून कोणतेही वाद होऊ नयेत यासाठी हा निर्णय घेतल्याचं मिनाती यांनी सांगितलं. 'माझी बहिण या निर्णयाविरोधात आहे. सामल यांना संपत्ती देण्यास तिचा विरोध आहे. पण माझ्या मुलीच्या निधनानंतर कोणत्याच नातेवाईकानं माझी काळजी घेतली नाही. कोणी साधं भेटायलादेखील आलं नाही,' असं मिनाती यांनी सांगितलं.
बुद्धा सामल २५ वर्षांपासून माझ्या कुटुंबाच्या पाठिशी उभा आहे. माझी मुलगी कोमल शाळेत जायची, त्यावेळी बुद्धा तिची संपूर्ण काळजी घ्यायचा. त्यानं आणि त्याच्या कुटुंबानं नेहमीच मला आदर आणि आधार दिला. कुटुंबातला सदस्य जितकी सेवा करणार नाही, त्यापेक्षा जास्त सेवा बुद्धा आणि त्याच्या कुटुंबानं केली आहे, अशा शब्दांत मिनाती यांनी कृतज्ञता व्यक्त केली.