देशातील ६३.९२ टक्के रुग्ण झाले पूर्णपणे बरे
By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2020 05:53 AM2020-07-27T05:53:58+5:302020-07-27T05:54:24+5:30
देशात कोरोनामुळे रविवारी ७०५ जण मरण पावले असून, त्यामुळे एकूण बळींची संख्या ३२,०६३ झाली आहे.
नवी दिल्ली : देशामध्ये रविवारी कोरोनाचे ४८,६६१ नवे रुग्ण आढळून आले असून त्यामुळे या आजाराच्या रुग्णांची एकूण संख्या १३,८५,५२२ झाली आहे. त्यात दिलासादायक बाब ही की, कोरोनाच्या आजारातून पूर्णपणे बरे झालेल्या रुग्णांची संख्या ८,८५,५७६वर पोहोचली आहे.
केंद्रीय आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार, देशात कोरोनामुळे रविवारी ७०५ जण मरण पावले असून, त्यामुळे एकूण बळींची संख्या ३२,०६३ झाली आहे. सध्या ४,६७,८८२ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. कोरोनाच्या आजारातून पूर्णपणे बरे होणाऱ्यांची संख्या ६३.९२ टक्के इतकी आहे. देशात सलग चौथ्या दिवशी ४५ हजारांपेक्षा नवे रुग्ण आढळून आले आहेत. रविवारी ३६,१४५ रुग्ण कोरोनातून पूर्णपणे
बरे झाले असून, त्यांना रुग्णालायतून घरी जाण्याची परवानगी डॉक्टरांनी दिली.
कोरोना रुग्णांची संख्या तमिळनाडूमध्ये २०६७३७, कर्नाटकमध्ये ९०,९४२, आंध्र प्रदेशमध्ये ८८६७१, पश्चिम बंगालमध्ये ५६३७७, उत्तर प्रदेशमध्ये ६३७४२, दिल्लीमध्ये १२९५३१, गुजरातमध्ये ५४६२६, बिहारमध्ये ३६६०४, झारखंडमध्ये ७८३६, राजस्थानात ३५२९८, ओदिशामध्ये २४०१३ इतकी आहे. अन्य राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमध्येही कोरोनाचे रुग्ण लक्षणीय प्रमाणात आढळून आले आहेत.
दिवभरात ४ लाख ४२ हजारांहून अधिक चाचण्या
इंडियन कौन्सिल आॅफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) या संस्थेने दिलेल्या माहितीनुसार शनिवारी देशभरात ४,४२,२६३ कोरोना चाचण्या घेण्यात आल्या असून, हा आजवरचा उच्चांक आहे. २५ जुलैपर्यंत देशभरातील कोरोना चाचण्यांची एकूण संख्या १,६२,९१,३३१ झाली आहे.