हरयाणात निवडणुकांसाठी सुरक्षा दलांचे ६४ हजार जवान, १२ मे रोजी १० जागांसाठी होणार लढत
By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2019 05:46 AM2019-05-08T05:46:22+5:302019-05-08T05:46:43+5:30
लोकसभा निवडणुकांच्या सहाव्या टप्प्यात हरयाणामध्ये १० जागांसाठी १२ मे रोजी होणारे मतदान निर्भय व निष्पक्ष वातावरणात पार पडावे म्हणून तिथे राज्य पोलीस दल व केंद्रीय सुरक्षा दलांचे तब्बल ६४ हजार जवान तैनात करण्यात येणार आहेत.
चंदीगड - लोकसभा निवडणुकांच्या सहाव्या टप्प्यात हरयाणामध्ये १० जागांसाठी १२ मे रोजी होणारे मतदान निर्भय व निष्पक्ष वातावरणात पार पडावे म्हणून तिथे राज्य पोलीस दल व केंद्रीय सुरक्षा दलांचे तब्बल ६४ हजार जवान तैनात करण्यात येणार आहेत.
अतिरिक्त पोलीस महासंचालक नवदीप सिंह विर्क यांनी सांगितले की, केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांच्या पाच कंपन्या येऊन पोहोचल्या आहेत. त्यांनी विविध जिल्ह्यांत फ्लॅग मार्चही केला. लोकसभा निवडणुकांचा पाचवा टप्पा सोमवारी पार प्पडल्याने राजस्थानातून केंद्रीय सशस्त्र पोलिस दलांच्या आणखी ६० कंपन्या हरियाणामध्ये रवाना होत आहेत. त्याशिवाय केंद्रीय सुरक्षा दलाच्या आणखी कंपन्यांची मागणी गृह मंत्रालय व आयोगाने केली आहे.
नवदीप सिंह विर्क म्हणाले की, राज्यातील ३३ हजार ३४० पोलिसांना निवडणूक काम देण्यात आले आहे. याशिवाय ११ हजार ७५० होमगार्ड, ८ हजार ६३ विशेष पोलीस अधिकारी (एसपीओ), ५ हजार ७८८ पोलीस प्रशिक्षणार्थीं यांनाही निवडणुकीच्या सुरक्षा व्यवस्थेत सामील करून घेण्यात आले आहे.
गुन्हेगारांना अटक
निवडणुका नीट पार पडाव्यात यासाठी सुरक्षा यंत्रणांना दक्ष राहाण्याचे आदेश देण्यात आले आहेत. विर्क म्हणाले की, मतदान प्रक्रियेत अडथळा आणण्यांवर कडक कारवाई करण्यात येईल. निवडणुकांआधी राज्यातील १०५० गुन्हेगारांना अटक करण्याबरोबरच मोठ्या प्रमाणावर अवैध दारू, अमली पदार्थ, रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.