शेती व शेतकऱ्यांच्या कल्याणावर दरवर्षी ६.५ लाख कोटींचा खर्च- नरेंद्र मोदी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2023 08:26 AM2023-07-02T08:26:55+5:302023-07-02T08:27:10+5:30
सहकारी संस्थांनी राष्ट्रीय धोरणांना प्राधान्य द्यावे
नवी दिल्ली : सरकार कृषी क्षेत्र आणि शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी दरवर्षी ६.५ लाख कोटी रुपये खर्च करत आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी येथे सांगितले. निवडणुकीतील आश्वासनावरून काँग्रेसवर थेट हल्लाबोल करताना मोदी म्हणाले की, केंद्र सरकार केवळ आश्वासने देत नाही, तर ती पूर्णही करते.
‘आंतरराष्ट्रीय सहकार दिना’ निमित्त आयोजित ‘भारतीय सहकारी काँग्रेस’ कार्यक्रमाला ते संबोधित करत होते. मोदी म्हणाले की, सहकारी संस्थांनी राजकारण न करता सामाजिक आणि राष्ट्रीय धोरणांना प्राधान्य द्यावे. पारदर्शकता आणि भ्रष्टाचारमुक्त प्रशासनाचे मॉडेल बनून डिजिटल माध्यमांचा अवलंब करावा, असे आवाहनही त्यांनी केले. २०१४ मध्ये सत्तेत आल्यापासून कृषी आणि संबंधित क्षेत्रातील सरकारच्या कामगिरीवर ही मोदींनी प्रकाश टाकला. ते म्हणाले की, सरकार इतर देशांच्या तुलनेत स्वस्त दरात खतांचा पुरवठा करत आहे. किमान आधारभूत किमतीवर मोठ्या प्रमाणात अन्नधान्य खरेदी केले आहे.
खतांच्या अनुदानावर १० लाख कोटी रुपये खर्च
सरकारने गेल्या वर्षी खतांच्या अनुदानावर १० लाख कोटी रुपये खर्च केले. शेतकऱ्यांना युरियाची एक पिशवी २७० रुपयांना मिळत आहे आणि ही किंमत बांगलादेश (७२० रुपये), पाकिस्तान (८०० रुपये), चीन (२१०० रुपये) आणि अमेरिका (३००० रुपये) पेक्षा खूपच कमी असल्याचे मोदींनी नमूद केले.
‘ही मोदींची हमी’
पंतप्रधान मोदी म्हणाले, देशातील प्रत्येक शेतकऱ्याला दरवर्षी सुमारे ५०,००० रुपये या ना त्या मार्गाने मिळतील यासाठी सरकार पावले उचलत आहे. ही मोदींची हमी आहे आणि मी जे केले ते सांगत आहे, आश्वासने देत नाही.