६५ हजार कोटींचे काळे धन घोषित
By admin | Published: October 1, 2016 03:54 AM2016-10-01T03:54:50+5:302016-10-01T03:54:50+5:30
काळा पैसा बाहेर काढण्यासाठी केंद्र सरकारने घोषित केलेल्या उत्पन्न प्रकटीकरण योजनेची मुदत संपत असताना शुक्रवारी रात्री आठ वाजेपर्यंत सुमारे ६५ हजार कोटी रुपये करदात्यांनी
नवी दिल्ली : काळा पैसा बाहेर काढण्यासाठी केंद्र सरकारने घोषित केलेल्या उत्पन्न प्रकटीकरण योजनेची मुदत संपत असताना शुक्रवारी रात्री आठ वाजेपर्यंत सुमारे ६५ हजार कोटी रुपये करदात्यांनी घोषित केल्याचे वृत्त काही इंग्रजी संकेतस्थळांनी दिले आहे.
आयकर विभागाच्या देशभरातील कार्यालयांत या योजनेचा लाभ घेण्यासाठी झुंबड उडाल्याचे दिसून आले. ४० ते ५० हजार कोटी रुपयांपर्यंत काळा पैसा जमा हाईल, असा अंदाज आयकर अधिकाऱ्यांनी वर्तविल्याचे वृत्त पीटीआय या वृत्तसंस्थेने रात्री ९ दिले. तथापी आयकर अधिकाऱ्याने सांगितले की, रात्री आठ वाजेपर्यंत घोषित झालेल्या ६५ हजार कोटींच्या उत्पन्नावर सरकारला सुमारे ३0 कोटींचा कर मिळेल. या योजनेची मुदत संपली. करदात्यांसाठी शेवटच्या दिवशी मध्यरात्रीपर्यंत कार्यालये उघडी ठेवण्यात आली. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा, तीन तास शिल्लक होते. मुदत संपेपर्यंत सुमारे ७0 हजार कोटी ते ८0 हजार कोटी रुपयांचे उत्पन्न जाहीर होऊ शकते, असे या अधिकाऱ्याने सांगितले. (वृत्तसंस्था)
हैदराबाद पहिल्या, मुंबई दुसऱ्या स्थानी
सर्वाधिक उत्पन्न जाहीर करणारे शहर म्हणून हैदराबाद समोर आले. हैदराबादेतून १३ हजार कोटी रुपयांचे उत्पन्न जाहीर केले गेले. त्याखालोखाल मुंबईत ८,५00 कोटी, दिल्ली ६ हजार कोटी, कोलकातामध्ये ४ हजार कोटी रुपयांचे उत्पन्न जाहीर झाले. मुंबईत एकूण ४ हजार लोकांनी या योजनेचा लाभ घेतला.
काळा पैसा बाहेर काढण्यास सरकारने ही योजना जाहीर केली होती. बेनामी उत्पन्नावर ४५ टक्के कर भरून उत्पन्न नियमित करून घेण्याची सोय यात होती.