हा कसला न्याय? नोकरीची वाट पाहत 40 वर्षे गेली; तारुण्यात अप्लाय केलं, म्हातारपणी आली ऑफर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2024 01:19 PM2024-01-20T13:19:02+5:302024-01-20T13:20:01+5:30

सरकारी शाळेत शिक्षक पदावर नियुक्ती झाल्याची माहिती देण्यात आली होती. नियुक्तीपत्र मिळाल्यानंतर आनंद होण्याऐवजी धक्काच बसला.

66 got job offer letters in their 60s including 3 dead in west bengal new teachers list | हा कसला न्याय? नोकरीची वाट पाहत 40 वर्षे गेली; तारुण्यात अप्लाय केलं, म्हातारपणी आली ऑफर

हा कसला न्याय? नोकरीची वाट पाहत 40 वर्षे गेली; तारुण्यात अप्लाय केलं, म्हातारपणी आली ऑफर

पश्चिम बंगालमधील काही वृद्ध लोकांसोबत एक अजब घटना घडली आहे. त्यांना वयाच्या त्या टप्प्यावर सरकारी नोकऱ्यांसाठी ऑफर लेटर मिळालं आहे जेव्हा त्यांना नोकरीची नाही तर सेवानिवृत्तीच्या लाभांची गरज आहे. हुगळीच्या फुरफुरा शरीफ येथील रहिवासी तुषार बॅनर्जी यांना नुकतंच पश्चिम बंगाल प्राथमिक शिक्षण मंडळाकडून ऑफर लेटर मिळालं. ज्यामध्ये सरकारी शाळेत शिक्षक पदावर नियुक्ती झाल्याची माहिती देण्यात आली होती. नियुक्तीपत्र मिळाल्यानंतर त्यांना आनंद होण्याऐवजी धक्काच बसला.

तुषार बॅनर्जी यांच्यासारख्या शेकडो लोकांनी 1980 च्या दशकात नोकऱ्यांसाठी अर्ज केला होता. अटी व शर्ती पूर्ण करूनही नोकऱ्या न मिळाल्याने अनेकांनी 1983 मध्ये न्यायालयात धाव घेतली. न्यायालयीन कारवाईनंतर हुगळीच्या शिक्षण विभागाने 66 जणांच्या नावाने जॉब ऑफर लेटर जारी केलं. या यादीतील तीन जण आता या जगात नाहीत. बाकीच्या लोकांचं म्हणणं आहे की त्यांना हे पत्र मिळू नये पण पेन्शन पण इतर बाबींचे पेमेंट मिळाले पाहिजे, हा त्यांचा हक्क आहे.

इंडियन एक्स्प्रेसमधील वृत्तानुसार, या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन हुगळी जिल्हा प्राथमिक शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा शिल्पा नंदी यांनी स्पष्टीकरण दिलं आणि म्हटलं - "ही अशी परिस्थिती उद्भवली कारण न्यायालयाच्या कागदपत्रात उमेदवारांची नावे आणि पत्ते नमूद केले गेले होते, परंतु वय लिहिलेलं नाही. डिसेंबर 2023 च्या कोलकाता उच्च न्यायालयाच्या आदेशात प्रत्येकाला शिक्षक मानलं जावं असं लिहिलेलं असल्याने आम्हाला ही कारवाई पूर्ण करावी लागली."

"2014 पासून सर्वांना शिक्षक म्हणून ग्राह्य धरण्यात यावे, असे आदेश न्यायालयाने दिले, त्यामुळे नियुक्तीपत्र पाठवणं आवश्यक होतं." जेव्हा हे लोक न्यायालयात गेले तेव्हा त्यांचं वय 30 ते 36 वर्षांच्या दरम्यान होतं. आता काही 71 वर्षांचे आहेत तर काही 76 वर्षांचे आहेत, त्यामुळे त्यांना लवकरात लवकर सर्व आर्थिक लाभ मिळावेत यासाठी प्रत्येकजण न्यायालयाच्या आदेशाची वाट पाहत आहे.
 

Web Title: 66 got job offer letters in their 60s including 3 dead in west bengal new teachers list

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Teacherशिक्षक