मुद्रा योजनेमुळे ६६ लाख लोकांचा फायदा- पंतप्रधान नरेंद्र मोदी
By admin | Published: November 29, 2015 01:45 PM2015-11-29T13:45:09+5:302015-11-29T13:46:50+5:30
मुद्रा' योजनेमुळे ६६ लाख लोकांचा फायदा झाला असून त्यात २४ लाख महिलांसह एससी,एसटी व ओबीसी गटातील लोकांचा समावेश असल्याचे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'मुद्रा' योजनेसाठी सरकारचे कौतुक केले.
Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २९ - 'मुद्रा' योजनेमुळे ६६ लाख लोकांचा फायदा झाला असून त्यात २४ लाख महिलांसह एससी,एसटी व ओबीसी गटातील लोकांचा समावेश असल्याचे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'मुद्रा' योजनेसाठी सरकारचे कौतुक केले. ही योजना लागू होऊन अद्याप काही काळच झाला असला तरी कमी वेळात ६६ लाख लोकांना त्याचा लाभ मिळाला आहे, आत्तापर्यंत ४२ हजार कोटी रुपये लोकांमध्ये वाटण्यात आल्याचे मोदींनी 'मन की बात' या कार्यक्रमादरम्यान देशवासियांना सांगितले. दरम्यान या वेळी त्यांनी ' एक भारत, श्रेष्ठ भारत‘ या विचाराला योजनेमध्ये परावर्तित करायचे आहे असे सांगत मोदींनी या योजनेसाठी सूचना, कल्पना पाठवण्याचे आवाहन देशवासियांना केले.
"मन की बात‘ या कार्यक्रमाच्या चौदाव्या भागाद्वारे मोदी यांनी रविवारी देशवासियांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध विषयांना स्पर्श केला. देशातील विविध भागात गेल्या काही दिवसांत कमी-जास्त पाऊस झाला असून तामिळनाडूमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे मोठे नैसर्गिक संकट उद्भवल्याचे सांगत देशवासिय संकटग्रस्तांच्या पाठिशी ठामपणे उभे असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या नैसर्गिक संकटावर मात करण्यासाठी राज्य व केंद्र सरकारसह, नागरिक व अनेक संस्थांनी मोठी मदत केल्याचेही त्यांनी नमूद केले.
येत्या ३ डिसेंबर रोजी संपूर्ण जगभरात 'जागतिक अपंग दिन' सादरा करण्यात येणार आहे असून त्या पार्श्वभूमीवर बोलताना मोदींनी शारीरिक व मानसिकदृष्ट्या अपंग असलेले लोकही आपल्यासाठी प्रेरणादायी ठरतात, असे मत व्यक्त केले. त्यांच्याकडे दयाभावनेने न पाहता पाहण्याचा दृष्टीकोन बदलला तर ते आपल्याला जगण्याची प्रेरणा देतात असेही ते म्हणाले. त्यासंदर्भात त्यांनी १९९६ साली काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यात जखमी झालेल्या जावेद अहमदचे उदाहरणही मोदींनी दिले. हल्ल्यात जखमी झाल्याने पुढील आयुष्य समाजकार्यासाठी देण्याचा संकल्प अहमद यांनी केला आहे आणि त्यादृष्टिने ते कार्य करत आहेत, असे मोदी म्हणाले.