BSF चे 67 जवान कोरोना पॉझिटीव्ह, सुट्टीवर गेलेल्या जवानासही लागण
By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2020 02:37 PM2020-05-05T14:37:54+5:302020-05-05T14:38:04+5:30
दिल्लीतील जामिया परिसरात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी तैनात करण्यात आलेल्या सर्वाधिक बीएसएफ जवानांचा यामध्ये समावेश आहे. त्रिपुरामध्येही बीएसएफ जवानांस कोरोनाची बाधा झाल्याचे आकडे अधिक आहेत
नवी दिल्ली - कोरोना विषाणूच्या वेगाने होत असलेल्या फैलावामुळे देशातील परिस्थिती दिवसेंदिवस चिंताजनक होत चालली आहे. लॉकडाऊनमुळे देशात कोरोनाचा सार्वत्रिक फैलाव झाला नसला तरी काही ठिकाणी कोरोना रुग्णांचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. मुंबईत अनेक पोलिसांना कोरोनाची लागण झाल्याच्या बातम्या आल्या. तर आतापर्यंत ४ पोलिसांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. त्यात, सोमवारी पुण्यातील एका सहायक पोलीस निरीक्षकाचाही समावेश आहे. लॉकडाऊन काही प्रमाणात शिथील करण्यात आलं आहे. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव अद्यापही वाढतानाच दिसत आहे. बीएसफमध्येही कोरोनाच प्रादुर्भाव वाढला असून ६७ जवानांना कोरोनाची लागण झाली आहे.
दिल्लीतील जामिया परिसरात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी तैनात करण्यात आलेल्या सर्वाधिक बीएसएफ जवानांचा यामध्ये समावेश आहे. त्रिपुरामध्येही बीएसएफ जवानांस कोरोनाची बाधा झाल्याचे आकडे अधिक आहेत. बॉर्डर सिक्युरिटी फोर्सने मंगळवारी याबाबत माहिती दिली. त्यानुसार, त्रिपुराच्या एका कॅम्पमध्ये बीएसएफच्या १३ कोरोना तपासणी अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. त्यामध्ये १० जवानांचा समावेश असून उर्वरीत ३ एका जवानाच्या कुटुंबातील सदस्य (पत्नी व २ मुले) आहेत. त्यामुळे त्रिपुरामध्ये कोरोनाची लागण झालेल्या जवानांची संख्या आता २४ वर पोहोचली आहे.
बीएसएफचे सर्वाधिक संक्रमित जवान दिल्लीत आहेत. दिल्लीत आत्तापर्यंत ४१ बीएसएफ जवान/अधिकारी कोरोना पॉझिटीव्ह आढळले आहेत. त्यामध्ये, एक जवान केंद्रीय पथकासमवेत कोलकाता येथे ड्रायव्हर म्हणून गेला होता. दिल्लीतील कोरोनाबाधित बीएसएफ जवानांपैकी ३२ जवान जामिया आणि चांदणी महल परिसरात कर्तव्य बजावत होते. तर ८ प्रकरणे ही आरके पुरम येथील रुग्णालयाशी संबंधित आहेत. सुट्टीवर गेलेला एक जवानही कोरोना पॉझिटीव्ह असल्याचे बीएसएफने सांगितले आहे.
आणखी वाचा
"ही तिकिटं नाहीत; मग काय मजुरांना गावी सोडण्यासाठी घेतलेली खंडणी आहे का?"
चाकण, खेड परिसरातील सर्व उद्योगधंदे सुरू, जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांना परवानगी
JEE, NEET परीक्षांची तारीख जाहीर, लाखो विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली