गुड न्यूज! नववर्षाच्या पहिल्याच दिवशी 67,385 बाळांचा जन्म; भारताने रचला विक्रम
By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2020 10:57 AM2020-01-02T10:57:19+5:302020-01-02T11:14:19+5:30
नववर्षाच्या पहिल्याच दिवशी भारताने विक्रम रचला आहे.
नवी दिल्ली - सरत्या वर्षाला निरोप देत जगभरात मोठ्या उत्साहात नवीन वर्ष 2020 चे स्वागत करण्यात आले आहे. जगभरात नववर्षाचा उत्साह पाहायला मिळाला. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी भारताने विक्रम रचला आहे. बुधवारी भारतात 67,385 बाळांचा जन्म झाला आहे. 1 जानेवारी 2020 रोजी जन्म घेतलेल्या बाळांची संख्या ही जगभरात सर्वाधिक असल्याची माहिती आता समोर आली आहे. तर चीन यामध्ये दुसऱ्या स्थानावर आहे. यूनिसेफने याबाबतची आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.
यूनिसेफने दिलेल्या आकडेवारीनुसार, जगभरात 1 जानेवारी 2020 रोजी 3,92,078 बाळांचा जन्म झाला. त्यामध्ये भारतात जन्मलेल्या बाळांची संख्या ही 17 टक्के आहे. भारतात सर्वाधिक म्हणजेच 67,385 बाळांचा जन्म झाला आहे. यामध्ये चीन दुसऱ्या स्थानी आहे. त्यानंतर नायजेरिया, पाकिस्तान, इंडोनेशिया, अमेरिका, कांगो या देशांचा नंबर आहे. लोकसंख्येत अव्वल स्थानी असलेल्या चीनमध्ये 46,299 बाळांनी जन्म घेतला आहे.
नववर्षाच्या पहिल्याच दिवशी नायजेरियात 26,039, पाकिस्तानात 16,787, इंडोनेशियात 13,020, अमेरिकेत 10,452 बाळांनी जन्म घेतला आहे. 1 जानेवारी 2020 मध्ये फिजी देशात पहिल्या बाळाचा जन्म झाला तर अमेरिकेत त्या दिवशी शेवटच्या बाळाचा जन्म झाल्याची नोंद झाली आहे. 1 जानेवारी याच दिवशी आपल्या मुलाचा जन्म व्हावा अशी अनेक पालकांची इच्छा असते. यासाठी सिझेरियनद्वारे अनेक महिलांनी बाळांना जन्म दिल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
मुंबई, गोवा, दिल्ली या शहरांसह देशामध्ये अनेक ठिकाणी आकर्षक रोषणाई आणि आतषबाजी करत नववर्षाचे दणक्यात स्वागत करण्यात आले. टि्वटरवर #हॅप्पी न्यू ईअर 2020, #न्यू ईअर, #गुडबाय 2019, #वेलकम 2020 असे हॅशटॅग वापरून शुभेच्छांचा वर्षाव झाला. जगभरात नववर्षाचा उत्साह पाहायला मिळला. टोंगा आयलँडने सर्वात आधी नवीन वर्षाचे स्वागत केले. न्यूझीलंडमध्ये नववर्षाचे स्वागत करण्यात आले.नववर्षाच्या स्वागताच्या जल्लोषात संपूर्ण मुंबईकर रंगून गेले होते. वर्षाअखेरीच्या पार्ट्या आणि कार्यक्रमाला मंगळवारच्या सायंकाळपासूनच सुरुवात झाली होती. नव्या वर्षाच्या स्वागतासाठी शहर रोषणाईने झगमगले होते. या रोषणाईत मंगळवारी आकाशातील आतषबाजीचीही भर पडली. शहरात तुरळक ठिकाणी नव्या वर्षांच्या आगमनावेळी फटाके फोडण्यात आले, तसेच नवीन वर्षाच्या स्वागताचा उत्साह अनुभवण्यासाठी मुंबईकरांनी चौपाट्यांवर गर्दी केली होती.