४० दिवसांत ६९ लाखांची रोजगारासाठी नोंदणी; फक्त ७,७०० लोकांच्या हातांना मिळाले पुन्हा काम
By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2020 01:25 AM2020-08-25T01:25:14+5:302020-08-25T01:25:31+5:30
लोकांना रोजगार देण्यासाठी ५१४ कंपन्यांनी आपली नावे असीम पोर्टलवर दिली आहेत. त्यापैकी ४४३ कंपन्यांनी १.४९ लाख नोकऱ्यांची माहिती या पोर्टलवर दिली आहे
नवी दिल्ली : कोरोना संकटामुळे बेरोजगार झालेल्या स्थलांतरित मजुरांसह इतरांनाही पुन्हा रोजगार मिळावा यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ११ जुलै रोजी उद््घाटन केलेल्या असीम (आत्मनिर्भर स्किल्ड एम्प्लॉई एम्प्लॉयर मॅपिंग) या पोर्टलवर त्यानंतरच्या ४० दिवसांत सुमारे ६९ लाख लोकांनी नोंदणी केली; पण प्रत्यक्षात त्यापैकी ७७०० लोकांनाच पुन्हा काम मिळाले आहे.
ही आकडेवारी त्या पोर्टलवरून कौशल्य विकास मंत्रालायने गोळा केली आहे. १४ आॅगस्ट ते २१ आॅगस्टदरम्यान सात लाखांहून अधिक स्थलांतरित मजुरांनी रोजगारासाठी या पोर्टलवर नोंदणी केली. मात्र, त्यातील ६९१ जणांनाच पुन्हा रोजगार मिळू शकला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार असीम पोर्टलवर नोंदणी केलेल्या ६९ लाख लोकांपैकी १.४९ लाख लोकांना विविध रोजगाराच्या संधी देऊ करण्यात आल्या; पण त्यातील फक्त ७,७०० लोकांनी त्या रोजगाराचा स्वीकार केला.
अंगी विविध कौशल्ये असलेल्या लोकांना काही काळापुरते काम मिळवून देण्यासाठी असीम पोर्टल सुरू करण्यात आले आहे, असे कौशल्य विकास मंत्रालयाने सांगितले. असीम पोर्टलवर केवळ स्थलांतरित मजूरच नाही तर शिंपी, इलेक्ट्रिशियन, तंत्रज्ञ अशा अनेक मंडळींनी रोजगारासाठी आपले नाव नोंदविले आहे. मात्र, देशात सध्या कुरिअर डिलिव्हरी, अकाऊंट्स एक्झिक्युटिव्ह, नर्स, स्वच्छता कामगार, सेल्स एक्झिक्युटिव्ह या जागांकरिता उमेदवारांचा मोठ्या प्रमाणावर शोध सुरू आहे.
कौशल्य विकास मंत्रालयाकडील आकडेवारीवरून, असे दिसते की, कर्नाटक, दिल्ली, हरयाणा, तेलंगणा, तामिळनाडू या राज्यांमध्ये मजुरांचा प्रचंड तुटवडा आहे. या राज्यांत असलेले स्थलांतरित मजूर कोरोना साथीच्या काळात उत्तर प्रदेश, बिहारमधील आपापल्या गावी गेले. त्यामुळे या राज्यांत मजुरांचा व कामगारांचा मोठा तुटवडा आहे.
लोकांना रोजगार देण्यासाठी ५१४ कंपन्यांनी आपली नावे असीम पोर्टलवर दिली आहेत. त्यापैकी ४४३ कंपन्यांनी १.४९ लाख नोकऱ्यांची माहिती या पोर्टलवर दिली आहे. त्यामध्ये लॉजिस्टिक, आरोग्य, बँकिंग, वित्तीय सेवा, इन्शुरन्स या क्षेत्रांतील नोकऱ्यांचा वाटा ७३.४ टक्के आहे.