मोदींच्या व्हीसीत ८ देशांचे प्रमुख झाले सहभागी; कोरोनाशी सार्कचा संयुक्त लढा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2020 04:49 AM2020-03-16T04:49:29+5:302020-03-16T04:50:14+5:30
व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये श्रीलंकेचे अध्यक्ष गोताबाया राजपक्ष, मालदीवचे अध्यक्ष इब्राहिम मोहम्मद सोलीह, नेपाळचे पंतप्रधान के.पी. शर्मा ओली, भूतानचे पंतप्रधान लोताय त्सेरिंग, बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना, अफगाणिस्तानचे अध्यक्ष अशरफ घानी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचे विशेष सहायक (आरोग्य) झफर मिर्झा यांचा समावेश होता.
नवी दिल्ली : संपूर्ण जगात पाच हजारांपेक्षा जास्त लोकांचे प्राण घेऊन पसरत चाललेल्या कोरोना व्हायरसला (कोविड-१९) अडवण्याची व्यूहरचना आखण्यासाठीच्या रविवारी झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह सार्क देशांचे नेते आणि प्रतिनिधी सहभागी होते.
व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये श्रीलंकेचे अध्यक्ष गोताबाया राजपक्ष, मालदीवचे अध्यक्ष इब्राहिम मोहम्मद सोलीह, नेपाळचे पंतप्रधान के.पी. शर्मा ओली, भूतानचे पंतप्रधान लोताय त्सेरिंग, बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना, अफगाणिस्तानचे अध्यक्ष अशरफ घानी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचे विशेष सहायक (आरोग्य) झफर मिर्झा यांचा समावेश होता. व्हिडिओ कॉन्फरन्सच्या प्रारंभीच्या भाषणात नरेंद्र मोदी म्हणाले की, दक्षिण आशियायी विभागात कोविड-१९ ने १५० पेक्षा कमी लोकांचे प्राण गेले असले तरी आम्ही सावध राहण्याची गरज आहे. ‘तयारीत असावे; परंतु दहशत घ्यायची गरज नाही’.
हा भारताचाकोरोना व्हायरसच्या उद्रेकाला हाताळताना मार्गदर्शक मंत्र आहे. आम्ही जानेवारीच्या मध्यापासूनच भारतात येत असलेल्या लोकांची तपासणी करायला सुरुवात केली होती. नंतर हळूहळू प्रवासावरील निर्बंध वाढवले गेले, असे मोदी म्हणाले.
टप्प्याटप्प्याने उपाययोजनांमुळे भीती किंवा दहशत टाळण्यास मदत झाली आणि ज्या गटांना धोका होऊ शकतो त्यांच्यापर्यंत विशेष प्रयत्न पोहोचले. सार्क देशांंनी एकत्र येऊन कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी काय करता येईल, असे मोदी शुक्रवारी म्हणाले होते व या सुचनेला सगळ्या देशांनी पाठिंबाही दिला होता. सार्क देशांच्या आठ सदस्य देशांनी जगासमोर उदाहरण ठेवावे व या सगळ्यांनी संयुक्त अशी व्यूहरचना तयार करावी, असे मोदी म्हणाले होते.
‘इमर्जन्सी फंड’साठी भारताचे १० दशलक्ष डॉलर्स
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘कोविड-१९ इमर्जन्सी फंड’ स्थापन करण्यात यावा, असे सुचवून त्यासाठी भारताचे १० दशलक्ष अमेरिकन डॉलर्स असतील, असे सांगितले. सार्क देशांनी एकत्र येऊन कोरोना व्हायरसशी लढण्याची व्यूहरचना आखावी, अशी सूचना मोदी यांनी या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये केली.
पाकिस्तानने काश्मीरचा मुद्दा केला उपस्थित
या व्हिडिओ कॉन्फरन्सचा वापर पाकिस्तानने काश्मीरचा मुद्दा उपस्थित करण्यासाठी केला. पाकिस्तानचे आरोग्य राज्यमंत्री जफर मिर्झा यांनी कोरोना व्हायरसला रोखण्याचा उपाय म्हणून काश्मीरमध्ये जनतेच्या येण्या-जाण्यावर असलेले निर्बंध मागे घ्यावेत, असे म्हटले.
जम्मू आणि काश्मीरमधील आरोग्याची आणीबाणी पाहता तेथे कोविड-१९ चा उद्रेक झाला, ही काळजी करण्याची बाब आहे. त्यामुळेच तेथे असलेले सगळे निर्बंध तात्काळ मागे घेतले जावेत. दूरसंचार आणि येणे-जाणे खुले झाले की, माहितीचा प्रसार व औषधांचा पुरवठा होईल, असे ते म्हणाले.