भारत आणि इस्रायलमध्ये 7 महत्त्वपूर्ण करार
By Admin | Published: July 5, 2017 06:48 PM2017-07-05T18:48:21+5:302017-07-05T19:03:11+5:30
भारत आणि इस्रायल या दोन देशांनी 7 मोठ्या करारांवर स्वाक्ष-या केल्या आहेत.
ऑनलाइन लोकमत
जेरुसलेम, दि. 5 - भारत आणि इस्रायल या दोन देशांनी 7 मोठ्या करारांवर स्वाक्ष-या केल्या आहेत. कृषी क्षेत्रासह अवकाश संशोधन क्षेत्रात सहकार्य करण्यासाठी हे करार करण्यात आले आहेत. मोदी आणि नेत्यानाहू यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन याची माहिती दिली आहे. अंतराळ, कृषी आणि संरक्षण क्षेत्रांतील सहकार्याबाबत दोन्ही देशांमध्ये सहमती झाली आहे. त्याप्रमाणेच गंगा स्वच्छतेसाठीही इस्रायलने भारतासोबत करार केलाय. भारत आणि इस्रायलमध्ये तब्बल 17 हजार कोटींचे करार झाले आहेत.
भारत आणि इस्रायलमधल्या सात महत्त्वाच्या करारांमध्ये अवकाश संशोधन, कृषी आणि संरक्षण क्षेत्रांचा समावेश आहे. दोन्ही देश औद्योगिक क्षेत्रात संशोधन आणि विकासासाठी सहकार्य करणार आहेत. पाणी आणि स्वच्छता क्षेत्रातही भारत आणि इस्रायल एकमेकांना मदत करणार आहेत. जलसंधारण, लहान उपग्रह या क्षेत्रांतही प्रगती करण्यासंदर्भात इस्रायल आणि भारतामध्ये करार झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींची महत्त्वाकांक्षी योजना असलेल्या "नमामि गंगे"ची स्वच्छता करण्यासाठी इस्रायल हातभार लावणार आहे.
भारत आणि इस्रायलमध्ये 7 करार
1 .40 कोटी डॉलरच्या भारत-इस्रायल इंडस्ट्रियल आर अँड डी अँड टेक्नॉलॉजिकल इन्व्हेन्शन फंडासाठी करार
2. भारताच्या जल संरक्षणासाठी करार
3. भारतातल्या राज्यांमध्ये पाण्याची गरज भागवण्यासंदर्भात करार
4. भारत-इस्रायल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन- कृषीच्या 3 वर्षांच्या (2018-2020)कार्यक्रमाची घोषणा
5. इस्रो आणि इस्रायलमध्ये आण्विक घड्याळ विकसित करण्यासाठीच्या सहयोगाची योजना
6. जीईओ आणि एलईओ ऑप्टिकल लिंकसाठी करार
7. छोट्या सॅटलाइटपासून वीजनिर्मिती करण्यासाठी करार
आणखी वाचा
(फुलाला दिलं "मोदी" नाव, इस्त्रायलने केला पंतप्रधानांचा सन्मान)
("आपका स्वागत है मेरे दोस्त", मोदींचं इस्त्रायलमध्ये हिंदीत स्वागत)
भारत आणि इस्रायल यांचे संबंध आज इतक्या वेगाने सुधारत असले तरी हा वेग गेल्या 70 वर्षांमध्ये कायम नव्हता. 1947 साली पॅलेस्टाइनचे विभाजन करण्याविरोधात भारताने संयुक्त राष्ट्रामध्ये मत दिले होते. त्याचप्रमाणे इस्रायलच्या यूएनमधील प्रवेशासही भारताने 1949 साली विरोध केला होता. 1950 साली भारताने इस्रायलला कायदेशीर मान्यता दिली. याबाबत बोलताना भारताचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरु म्हणाले होते, ही मान्यता आम्ही यापूर्वीच देऊ शकलो असतो, पण मध्यपुर्वेतील आमच्या अरब मित्रांना न दुखावण्याची आमची इच्छा होती. 1953 साली इस्रायलला मुंबईत वाणिज्य दुतावास उघडण्याची परवानगी मिळाली. 1950 ते 1990 या काळात भारत आणि इस्रायल यांचे संबंध अनौपचारिक स्वरुपाचे राहिले. अर्थात या काळामध्ये विविध आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर दोन्ही देशांचे नेते भेटत होतेच. 1992 साली दोन्ही देशांनी मुत्सद्दी पातळीवरचे संबंध प्रस्थापित केले. पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळामध्ये इस्रायलचे पंतप्रधान अरायल शेरॉन भारतात आले, त्यानंतर हे संबंध अधिक वाढीस लागले. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीने ते सर्वाधिक चांगल्या स्थितीत आहेत असे म्हणावे लागेल.
1992 - दोन्ही देशांमध्ये मुत्सद्दी पातळीवर संबंध प्रस्थापित
1997- इस्रायलचे राष्ट्रपती एझर वाइझमन यांची भारताला भेट