गुजरातमध्ये मुसळधार पाऊस, ७ ठार; ९ हजार लाेकांना सुरक्षित स्थळी हलविले
By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2022 12:06 PM2022-07-12T12:06:06+5:302022-07-12T12:06:27+5:30
जनजीवन विस्कळीत; ६ जिल्ह्यांना तडाखा.
गुजरातमध्ये गेल्या चोवीस तासांत पडलेल्या मुसळधार पावसामुळे राज्यातील काही जिल्ह्यांत पूरसदृश स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे सात जणांचा मृत्यू झाला असून नऊ हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे.
गुजरातमधील काही भागांत आगामी पाच दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.. गुजरातमधील छोटा उदेपूर, डांग, नर्मदा, वलसाड, नवसारी, पंचमहाल या सहा जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा तडाखा बसला आहे. गुजरातमधील ९ हजार लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. अहमदाबाद, नवसारी, नडियाद आदी शहरांमध्ये अनेक लोकांच्या घरात पाणी शिरले आहे.
मध्य प्रदेशात वीज कोसळून ३ ठार
मध्य प्रदेशमध्ये सागर जिल्ह्यातील सेमाढाना गावामध्ये रविवारी संध्याकाळी मुसळधार पाऊस कोसळत होता. त्यावेळी वीज कोसळून तीन मजूर ठार झाले. तर दोन मजूर गंभीर जखमी झाले. सेमाढाना गावामध्ये एका इमारतीचे काम करत असताना तिथे वीज कोसळली. या दुर्घटनेत जखमी झालेल्यांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मध्य प्रदेशात भोपाळसहित इतर ठिकाणी होत असलेल्या पावसामुळे जनजीवन काही प्रमाणात विस्कळीत झाले आहे. तसेच भोपाळ विमानतळावरील हवाई वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. राजस्थानमध्ये अनेक ठिकाणी चांगला पाऊस पडला आहे. कोटा, बारां, झालावाड, बूंदी या भागात जोरदार पाऊस झाल्याने नद्यांची जलपातळी वाढली आहे, गेल्या २४ तासांत बूंदी, सीकर, धौलपूर, भिलवाडा जिल्ह्यांतील ५ ठिकाणी मुसळधार पाऊस पडला आहे. सगळ्यात जास्त पाऊसमान भिलवाडा जिल्ह्यामध्ये आहे.
केरळच्या चार जिल्ह्यांमध्ये संततधार
केरळ, कर्नाटक, तेलंगणा, महाराष्ट्र यांना मुसळधार पावसाबाबत हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केला आहे. केरळमधील कोडिकोळ, वायनाडसह चार जिल्ह्यांमध्ये आगामी २४ तासांत मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. बिहारमधील ३० जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी कमी प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता आहे.