१३ महिन्यांत ७ दौरे, पंतप्रधान मोदी सातत्याने महाराष्ट्रामध्ये का येताहेत? असं आहे कारण
By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2024 09:20 PM2024-01-18T21:20:26+5:302024-01-18T21:21:57+5:30
Narendra Modi: गेल्या काही काळापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईचा दौरा केला होता. त्यावेळी मोदींनी देशातील सर्वात लांब पूल असलेल्या अटल सेतूचं उद्घाटन केलं होतं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शुक्रवारी सोलापूरच्या दौऱ्यावर येणार आहेत. इथे पंतप्रधान मोदी विविध विकासकामांचं उद्घाटन करणार आहेत. यामध्ये एका गृहनिर्माण प्रकल्पाचंही उद्घाटन होणार आहे. दरम्यान, गेल्या काही काळापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईचा दौरा केला होता. त्यावेळी मोदींनी देशातील सर्वात लांब पूल असलेल्या अटल सेतूचं उद्घाटन केलं होतं.
महाराष्ट्रामध्ये जून २०२२ मध्ये झालेल्या राजकीय उलथापालथीनंतर भाजपाने एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन केलं होतं. तेव्हापासून आतापर्यंत नरेंद्र मोदी यांनी सातवेळा महाराष्ट्राचा दौरा केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे वारंवार होत असलेले दौरे हे केवळ योगायोग नाही आहे. त्यांची नजर २०२४ च्या लोकसभा निवडणुकीवर आहे. उत्तर प्रदेश (८०)नंतर महाराष्ट्रामध्ये (४८) लोकसभेच्या सर्वाधिक जागा आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वारंवार होत असलेल्या दौऱ्यांमधून त्यांच्या लोकप्रियतेचा फायदा घेऊन अधिकाधिक जागा निवडून आणण्याचा भाजपाचा इरादा आहे.
भाजपाने पुढच्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रामधून ४५ हून अधिक जागा जिंकण्याचं लक्ष्य समोर ठेवलं आहे. मागच्या निवडणुकीत भाजपा आणि शिवसेनेने मिळून ४१ जागा जिंकल्या होत्या. आता महाराष्ट्रात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्ष फुटले आहेत. त्यामुळे लोकसभेच्या निवडणुकीच्या रणसंग्रामाला सुरुवात होण्यापूर्वी आघाडी घेणयाचा भाजपाचा प्रयत्न आहे.