विदर्भातील ७ आणि देशातील ८४ मतदारसंघांत उद्या मतदान

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2019 05:28 AM2019-04-10T05:28:24+5:302019-04-10T05:29:03+5:30

प्रचाराच्या तोफा थंडावल्या : नक्षलग्रस्त भागांवर करडी नजर

7 voters in Vidarbha and 84 constituencies in the country voted tomorrow | विदर्भातील ७ आणि देशातील ८४ मतदारसंघांत उद्या मतदान

विदर्भातील ७ आणि देशातील ८४ मतदारसंघांत उद्या मतदान

googlenewsNext

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात १८ राज्ये व दोन केंद्रशासित प्रदेशांमधील मिळून ९१ मतदारसंघांमधील प्रचाराच्या तोफा मंगळवारी सायंकाळी थंडावल्या. यामध्ये महाराष्ट्रातील विदर्भाच्या नागपूर, रामटेक, यवतमाळ-वाशिम, चंद्रपूर, भंडारा-गोंदिया, वर्धा आणि गडचिरोली-चिमूर या मतदारसंघांचा समावेश आहे. याशिवाय आंध्र प्रदेश, सिक्किम व अरुणाचल विधानसभेच्या सर्व जागांसाठी तर ओडिशा विधानसभेच्या २८ जागांसाठीचा प्रचारही संपला आहे. या सर्व ठिकाणी गुरुवार, दिनांक ११ रोजी मतदान होईल.


तसेच आंध्र प्रदेश (२५), अरुणाचल प्रदेश (२), मेघालय (२), उत्तराखंड (५), मिझोराम (१), नागालॅण्ड (१), सिक्किम (१), मणिपूर (१), त्रिपुरा (१), तेलंगणा (१७) या राज्यांतील, तसेच लक्षद्वीप (१) आणि अंदमान, निकोबार (१) मधील सर्व जागांवरही ११ एप्रिलला मतदान होणार आहे. ओडिशा (४), आसाम (५), बिहार(४), छत्तीसगड (१), जम्मू आणि काश्मीर(२), उत्तर प्रदेश (८), पश्चिम बंगाल(२) आणि महाराष्टÑ (७) या राज्यांमध्येही काही ठिकाणी प्रचार संपला आहे. या सर्व राज्यांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाध्यक्ष अमित शाह, कॉँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, तसेच संबंधित राज्यांचे मुख्यमंत्री व अन्य प्रमुख नेत्यांच्या प्रचारसभा झाल्या. यामुळे आरोप-प्रत्यारोपांची राळ उडाली होती.

विदर्भात १४ हजार १८९ केंद्रांवर होणार मतदान
विदर्भात १४ हजार १८९ मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. नक्षलग्रस्त गडचिरोलीमधील ५०० अतिसंवेदनशील मतदान केंद्रावर सुरक्षा यंत्रणांची करडी नजर आहे. मंगळवारचा दिवस रॅली, सभांनी गाजला. आता घरोघरी भेटींवर भर आहे. विदर्भात आज भाजपाध्यक्ष अमित शहा, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग, राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, खासदार प्रफुल्ल पटेल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रचार सभा झाल्या. आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी व राहुल गांधी यांच्याही सभा झाल्या होत्या.
शेवटच्या दिवशी सर्व राजकीय पक्षांनी शक्तिप्रदर्शन केले. नागपुरात नितीन गडकरी यांनी रॅली काढली. काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले यांनीही रॅली काढून शक्तिप्रदर्शन कले.

निसटत्या बहुमताने पुन्हा मोदी सरकारची शक्यता; मतदानपूर्व जनमत चाचण्यांचा सरासरी निष्कर्ष
लोकसभा निवडणुकीचे पहिल्या टप्प्याचे मतदान सुरू होण्यापूर्वीच्या आठवड्यात जनमताचा कौल घेणाऱ्या चार सर्वेक्षणांच्या सरासरीतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली रालोआचे सरकार निसटत्या बहुमताने पुन्हा सत्तेवर येण्याची शक्यता दिसते.
महाराष्ट्रात मात्र रालोआच्या जागा कमी होण्याची शक्यता आहे. गेल्या वेळी ४८ पैकी ४२ जागा रालोआला मिळाल्या होत्या. रालोआला ३३ ते ३५ जागा मिळतील आणि संपुआ व इतरांना उरलेल्या जागा मिळतील, असा अंदाज आहे.
सन २०१४च्या निकालांनंतर ५४३ पैकी ३३६ अशा बहुमताचे ‘रालोआ’चे सरकार स्थापन झाले होते, परंतु दिलेली आश्वासने न पाळल्याने मोदींच्या जादूला ओहोटी लागल्याचे चित्र आताच्या निवडणुकीत दिसेल, असा या चाचण्यांचा रोख दिसतो. भाजपला पुन्हा सत्तेवर येऊ न देण्याच्या इराद्याने विरोधी पक्ष यंदा एकवटले आहेत व काँग्रेसने त्यात पुढाकार घेतला आहे, पण पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर सरकारने केलेल्या कारवाईचा फायदा ‘रालोआ’ला होईल व निसटत्या बहुमतापर्यंत पोहोचविणारा कदाचित तोच प्रमुख मुद्दा ठरू शकेल, असे या चाचण्या म्हणतात.
‘सी-व्होटर’, ‘इंडिया टीव्ही-सीएनएक्स’, ‘सीएसडीएस-लोकनीती’ आणि ‘टाइम्स नाऊ-व्हीएमआर’ यांच्या सर्वेक्षणांमध्ये ‘रालोआ’ला २६३ ते २८३ या टप्प्यात जागा मिळतील व काँग्रेस शंभरपर्यंत मजल मारून बाळसे धरेल, हे निष्कर्ष सामाईक दिसतात.
अर्थात, ९० कोटी मतदारांचा खरा कौल सात टप्प्यांचे मतदान पूर्ण झाल्यावर २३ मे रोजीच स्पष्ट होईल.


असे आहेत सर्वेक्षणांचे अंदाज
सर्वेक्षण संस्था  रालोआ संपुआ इतर पक्ष
सी-व्होटर २६७ १४२ १३४
इंडिया-टीव्ही-सीएनएक्स २७५ १४७ १२१
सीएसडीएस-लोकनीती २६३-२८३ ११५-१३५ १३०-१६०
टाइम्स नाऊ-व्हीएमआर २७९ १४९ ११५
सर्वेक्षणांची सरासरी २७३ १४१ १२९

Web Title: 7 voters in Vidarbha and 84 constituencies in the country voted tomorrow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.