सायकल चालवताना ७ वर्षांच्या मुलाला आला हार्ट अटॅक; आईच्या कुशीतच घेतला अखेरचा श्वास
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2024 14:51 IST2024-09-08T14:51:14+5:302024-09-08T14:51:40+5:30
राघव घरासमोर सायकल चालवत असताना अचानक त्याच्या छातीत तीव्र वेदना जाणवू लागल्या. यानंतर त्याने आईकडे छातीत दुखत असल्याची तक्रार केली.

सायकल चालवताना ७ वर्षांच्या मुलाला आला हार्ट अटॅक; आईच्या कुशीतच घेतला अखेरचा श्वास
कोरोना व्हायरसपासून मध्य प्रदेशातील तरुण आणि लहान मुलांमध्ये हार्ट अटॅकची अधिक प्रकरणं नोंदवली जात आहेत. याच दरम्यान एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अवघ्या सात वर्षांच्या मुलाचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला. निवारी जिल्ह्यातील ओरछा येथे सात वर्षांच्या राघव उर्फ हनी दुबेला हार्ट अटॅक आला, त्यानंतर मुलाने आईच्या कुशीतच अखेरचा श्वास घेतला.
राघव घरासमोर सायकल चालवत असताना अचानक त्याच्या छातीत तीव्र वेदना जाणवू लागल्या. यानंतर त्याने आईकडे छातीत दुखत असल्याची तक्रार केली. परिस्थिती लक्षात येताच राघवच्या आईने आजूबाजूच्या लोकांकडे मदत मागितली आणि मुलाला तातडीने रुग्णालयात नेलं. ओरछाच्या सरकारी रुग्णालयातील डॉक्टरांनी राघवला झाशीच्या मेडिकल कॉलेजमध्ये पाठवण्याचा सल्ला दिला.
कुटुंबीय राघवला झाशीच्या मेडिकल हॉस्पिटलमध्ये घेऊन जात होते, तेव्हा वाटेत त्याची प्रकृती झपाट्याने खालावली आणि तो वेदनेने ओरडत होता. यावेळी त्याला उलट्या झाल्या आणि त्याचा श्वास थांबला. राघवची आई भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या ओरछा मंडळाची महासचिव आहे. या घटनेनंतर कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे.
पोस्टमॉर्टम रिपोर्ट आल्यानंतर मृत्यूचं खरं कारण समोर येईल. मात्र, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे हार्ट अटॅक येण्याचं प्रमाण वाढत असल्याचं डॉक्टरांचं मत आहे. मुलांना जंक फूडपासून दूर ठेवण्याचं आवाहन डॉक्टर वारंवार पालकांना करत आहेत. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, लहान मुलांनी हट्ट केला तरी त्यांना जंक फूड देऊ नये. त्याऐवजी, आरोग्यदायी अन्न आणि गाईचे दूध मुलांसाठी चांगलं आहे.