झाकण बाजूला ठेवून पुठ्ठ्याने झाकलं गटार; पाय ठेवताच कोसळला ७ वर्षाचा मुलगा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2024 08:45 AM2024-08-03T08:45:09+5:302024-08-03T08:47:19+5:30
दिल्लीत महापालिकेच्या भोंगळ कारभारामुळे एका चिमुकल्याचा जीव जाता जाता वाचला आहे.
Delhi Accident : देशाच्या बहुतांश भागात मुसळधार पाऊस पडत आहे. डोंगराळ भागात पावसामुळे दरडी कोसळण्याच्या घटना वाढल्या आहेत. केरळमधील वायनाडमध्ये मुसळधार पावसानंतर झालेल्या भूस्खलनामुळे शेकडो लोकांचा मृत्यू झाला. राजधानी दिल्लीत पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढत चालला आहे. दिल्लीत मुसळधार पावसानंतर पाणी भरल्यामुळे तीन तरुणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आता प्रशासनाच्या भोंगळ कारभाराची एक घटना समोर आली आहे. गटावरील झाकण गायब झाल्यामुळे एक मुलगा जखमी झाला आहे.
दिल्लीत महानगरपालिकेच्या निष्काळजीपणाचे प्रकरण समोर आले आहे. महापालिकेने केलेल्या चुकीमुळे त्यात सात वर्षांच्या चिमुरड्याचा जीव जाता जाता वाचला आहे. दक्षिण दिल्लीतील एका सार्वजनिक शाळेमध्ये इयत्ता तिसरीमध्ये शिकणारा मुलगा शुक्रवारी डिफेन्स कॉलनी परिसरात असलेल्या गटारात पडला. गटावर झाकण लावण्याऐवजी कागदी पुठ्ठा लावल्याने हा मुलगा मॅनहोलमध्ये पडला. सकाळी आठच्या सुमारास त्याचे वडील मुलाला शाळेत सोडण्यासाठी जात होते. त्याच्यासोबत त्याची आई आणि लहान बहीणही होती.
जेव्हा मुलगा शाळेच्या बाहेर गाडीतून उतरला तेव्हा त्याने अनवधानाने त्याचा पाय एका पुठ्ठ्यावर ठेवला, ज्याच्या खाली गटार होते. मुलाचे वजन पडताच पुठ्ठा फाटला आणि तो गटारामध्ये पडला. शेजारी उभे असलेले लोक आणि मुलाचे आई-वडील लगेचच धावून आले आणि त्याला गटारातून बाहेर काढले. मुलाला ताबडतोब एम्सच्या ट्रॉमा सेंटरमध्ये नेण्यात आले, तेथे त्याच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले.
A child fell into a sewer in Delhi's Defence Colony area. Police staff reached the location. The sewer lid was covered with a plyboard, which the 8-year-old boy, stepped on. The plyboard broke, causing him to fall into the sewer. The child was promptly rescued with the help of… pic.twitter.com/BLVfbowZRO
— ANI (@ANI) August 3, 2024
बँकेत कर्मचारी असलेल्या मुलाच्या वडिलांनी सांगितले की, गटाराचे झाकण त्याच ठिकाणी बाजूला ठेवण्यात आले होते आणि तिथे पुठ्ठ्याचे कव्हर ठेवण्यात आले होते. मुलाच्या वडिलांनी या अपघातासाठी दिल्ली महानगरपालिकेला जबाबदार धरलं आहे. मुलाच्या वडिलांनी शहरातील गटाराच्या ऑडिटवर प्रश्न उपस्थित करत या अपघाताची जबाबदारी एमसीडीच्या अधिकाऱ्यांनी घ्यावी, असं म्हटलं आहे.
मॅनहोलमध्ये एखादा वृद्ध पुरुष किंवा स्त्री पडली असती तर काय झाले असते? या घटनेसाठी कोणत्या प्रशासनाला जबाबदार धरावे?, असा सवाल मुलाच्या वडिलांनी केला. मुलाच्या पालकांकडून अद्याप कोणतीही तक्रार आलेली नाही. दरम्यान, गाजीपूर भागात बांधकाम सुरू असलेल्या नाल्यात पडून महिला आणि तिच्या मुलाचा मृत्यू झाल्याच्या काही दिवसांनंतर ही धक्कादायक घटना घडली आहे.
दरम्यान, मुसळधार पावसानंतर संपूर्ण दिल्लीत पाणी साचल्यानंतर अनेक धक्कादायक घटना समोर आल्या आहेत. २७ जुलै रोजी जुन्या राजेंद्र नगर परिसरात असलेल्या आरएयूच्या आयएएस कोचिंग सेंटरच्या तळघरात पावसाचे पाणी साचलं होतं. तळघरात पाणी तुंबल्याने यूपीएससीची तयारी करणारे तीन विद्यार्थी बुडाले होते. दिल्लीत पावसामुळे पाणी साचण्यानंतर घडलेल्या घटनांमध्ये आतापर्यंत ११ जणांचा मृत्यू झाला आहे.