लोकांना घाबरवणे पडले महागात; पोलिसांनी सात भुतांना केली अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2019 12:06 PM2019-11-13T12:06:06+5:302019-11-13T12:06:44+5:30
एका रिक्षाचालकांने पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत रस्त्यावर भूत फिरत असल्याचे सांगितले होते.
बंगळुरू - रात्रीच्या वेळी भूत बनून ये जा करणाऱ्यांना घाबरवणे काही तरुणांना चांगलेच महागात पडले आहे. भुतांचे सोंग घेऊन रस्त्यावरून जाणाऱ्यांना भीती दाखवणाऱ्या सात जणांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. हा प्रकार बंगळुरू येथील यशवंतपूरमधील शरीफानगर परिसरात उघडकीस आला आहे.
गेल्या काही काळात सोशल मीडियाच्या वाढत्या प्रभावासोबत प्रँक व्हिडीओ बनवण्याचे प्रमाणही वाढले आहे. मिळालेल्या माहितीनुसार यशवंतपूरमधील शरीफानगर परिसरात असलेल्या वस्तीत राहणारे हे सात तरुण यूट्युबवर प्रँक व्हिडीओ शेअर करत असत. गेल्या काही दिवसांपासून त्यांनी भून बनून प्रँक व्हिडीओ बनवण्यास सुरुवात केली होती. त्यासाठी ते संध्याकाळ होताच हे तरुण भुतांचे रूप घेऊन रस्त्यावरून ये जा करणाऱ्यांना घाबरवत असत. दरम्यान, या प्रकाराविरोधात पोलिसांकडे तक्रारी दाखल झाल्या होत्या.त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत भूत बनून लोकांना घाबरवणाऱ्या या तरुणांना अटक केली.
Karnataka: 7 YouTubers arrested for dressing as ghosts& scaring unsuspecting commuters in Bengaluru. S Kumar, DCP North says,"The youths were forcefully stopping & scaring the passersby, they were arrested under bailable sections & given bail in the police station itself" (11.11) pic.twitter.com/2TcEv2TCP6
— ANI (@ANI) November 12, 2019
याबाबत अधिक माहिती देताना पोलिस अधिकारी शशिकुमार यांनी सांगितले की, एका रिक्षाचालकांने पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत रस्त्यावर भूत फिरत असल्याचे सांगितले होते. तसेच काही तरुण रस्त्यांवर प्रँक करत असल्याची तक्रार आधीही आली होती. त्यानंतर काही दिवसांचे सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यानंतर आम्ही या सर्व तरुणांना अटक केली. हे सर्व तरुण आसपासच्या वस्त्यांमध्ये राहणारे असून, केवळ मजा करण्यासाठी ते लोकांना घाबरवत असत.