नारायण मूर्तींनी दिलेला 70 तास कामाचा सल्ला; विरोधकांनी अधिवेशनात उपस्थित केला मुद्दा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2023 06:10 PM2023-12-05T18:10:25+5:302023-12-05T18:11:36+5:30
संसदेच्या अधिवेशनात तीन विरोधी खासदारांनी 70 तास कामाचा मुद्दा उपस्थित केला. यावर केंद्रीय मंत्र्यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली.
70-Hour Work In Week: भारतातील दुसरी सर्वात मोठी आयटी कंपनी Infosys चे सह-संस्थापक नारायण मूर्ती गेल्या महिन्यापासून चर्चेत आहेत. कर्मचाऱ्यांनी दररोज 12 तास म्हणजे आठवड्यातून 70 तास काम करण्याचा सल्ला त्यांनी दिला होता. त्यांचा या मुद्द्याची देशभरात चर्चा झाली. उद्योग जगतात दोन गट पडले, काहींनी याचे समर्थन केले तर काहींनी विरोध केला. आता हाच मुद्दा संसदेच्या हिवाळी अधिवेशनामध्येही उपस्थित झाला.
मंत्री रामेश्वर तेली यांनी स्पष्ट केली भूमिका
मीडिया रिपोर्स्सनुसार, सोमवारी संसदेत तीन विरोधी खासदारांनी यावर सरकारची भूमिका जाणून घेण्यासाठी अधिवेशनात प्रश्न उपस्थित केला. यावर उत्तर देताना केंद्रीय कामगार आणि रोजगार राज्यमंत्री रामेश्वर तेली म्हणाले की, 'आठवड्यातून 70 तास काम करण्यासंबंधीचा कोणताही प्रस्ताव सरकारकडे आलेला नाही.
या तीन खासदारांनी प्रश्न विचारला होता
काँग्रेस खासदार कोमटी वेंकट रेड्डी, भारत राष्ट्र समितीचे मन्ने श्रीनिवास रेड्डी आणि वायएसआरसीपीचे नेते कनुमुरु रघु रामा कृष्णा राजू, या तीन खासदारांनी अधिवेशनता प्रश्न उपस्थित केला होता.
काय म्हणाले होते नारायण मूर्ती?
नारायण मूर्ती यांनी गेल्या महिन्यात इन्फोसिसचे माजी सीएफओ मोहनदास पै यांच्याशी 'द रेकॉर्ड' या पॉडकास्टसाठी बोलताना म्हटले होते की, अनेक देशांनी मागील काही दशकात मोठी प्रगती केली आहे, त्या देशांशी स्पर्धा करण्यासाठी देशातील तरुणांना आठवड्यातून 70 तास काम करावे लागेल. सध्या भारताची कामाची उत्पादकता जगात सर्वात कमी आहे. आपली सर्वात मोठी स्पर्धा चीनशी आहे, त्यामुळे तरुणांना अतिरिक्त काम करावे लागेल, जसे जपान आणि जर्मनीने दुसऱ्या महायुद्धानंतर केले होते.