येमेनमध्ये अडकले भारताचे ७० नाविक अडकले, सुटकेचे प्रयत्न सुरु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2015 07:52 PM2015-09-13T19:52:53+5:302015-09-13T19:52:53+5:30
हिंसाचारग्रस्त येमेनमध्ये गुजरातमधील ७० नाविक अडकले असून या नाविकांच्या सुटकेसाठी भारत सरकारने प्रयत्न सुरु केले आहेत.
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १३ - हिंसाचारग्रस्त येमेनमध्ये गुजरातमधील ७० नाविक अडकले असून या नाविकांच्या सुटकेसाठी भारत सरकारने प्रयत्न सुरु केले आहेत. या नाविकांच्या गटावर रॉकेट हल्लाही झाला असून या हल्ल्यातून सर्व नाविक बचावले असून सरकारने तातडीने आमची सुटका करावी अशी मागणी या नाविकांनी केली आहे.
गुजरातमधील ७० नाविक त्यांच्या मालवाहू नौकांसोबत येमेनमध्ये माल पोहोचवण्यासाठी गेले होते. मात्र गेल्या १५ दिवसांपासून हे सर्व येमेनमधील खोखा या बंदराजवळ अडकून पडले आहेत. येमेनवर सौदी अरेबियांचे हवाई हल्ले सुरु असून या नाविकांवरही रॉकेटने हल्ला झाला होता. मात्र यातून सर्वजण सुखरुप बचावले आहेत. मात्र आता या नाविकांमध्ये भीतीचे वातावरण असून भारत सरकारने या नाविकांच्या सुटकेसाठी मदत करावी अशी मागणी या नाविकांच्या कुटुंबीयांनी केली आहे. 'आम्ही सामान देण्यासाठी आलो होतो, पण आता आम्ही संकटात आहोत, ही लोकं आम्हाला मारुन टाकतील' असे सिकंदर नामक नाविकाने सांगितले आहे. सिकंदरने त्याच्या कुटुबीयांना ऑडिओ संदेशव्दारे त्याचे गा-हाणे मांडले आहे. परराष्ट्र मंत्रालयानेही याची दखल घेत स्थानिक यंत्रणांशी संपर्क साधल्याचे समजते.