३ दिवसांत ७० लाख लोक अयोध्येला, CM योगी आदित्यनाथांनी घेतला आढावा, महाकुंभमेळ्यातून धडा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2025 18:27 IST2025-01-31T18:26:45+5:302025-01-31T18:27:43+5:30

CM Yogi Adityanath: गेल्या अवघ्या ३ दिवसांत तब्बल ७० लाखांहून अधिक भाविक, पर्यटक अयोध्येत दाखल झाल्याचे सांगितले जात आहे.

70 lakh people came in ayodhya in last 3 days and cm yogi adityanath took a review from helicopter | ३ दिवसांत ७० लाख लोक अयोध्येला, CM योगी आदित्यनाथांनी घेतला आढावा, महाकुंभमेळ्यातून धडा!

३ दिवसांत ७० लाख लोक अयोध्येला, CM योगी आदित्यनाथांनी घेतला आढावा, महाकुंभमेळ्यातून धडा!

CM Yogi Adityanath: प्रयागराज येथे महाकुंभमेळ्यात त्रिवेणी संगमावर मौनी अमावस्येच्या दिवशी अमृत स्नानासाठी कोट्यवधी भाविक आले. त्या ठिकाणी ब्रह्म मुहूर्तावर झालेल्या चेंगराचेंगरीत ३० जणांचा मृत्यू झाला असून ६० जण जखमी झाले. चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही याबाबत तीव्र संवेदना व्यक्त केल्या. यानंतर आता प्रशासनाने खबरदारी म्हणून अनेक उपाययोजना करायला सुरुवात केली आहे. महाकुंभमेळ्यात सहभाग घेतल्यानंतर लाखो भाविक अयोध्येला जात आहेत. याचा आढावा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हवाई पाहणी करून घेतला.

१४४ वर्षांनी येणाऱ्या महाकुंभमेळ्यासाठी आतापर्यंत जवळपास ३० कोटींहून अधिक भाविक, पर्यटकांनी हजेरी लावली. भारतासह अनेक परदेशी नागरिकही महाकुंभमेळ्यासाठी आले आहेत. यानंतर भाविक अयोध्येला राम मंदिरात जाऊन रामललाचे दर्शन घेत आहेत. गेल्या अवघ्या तीन दिवसांत तब्बल ७० लाखांहून अधिक भाविक, पर्यटक अयोध्येत दाखल झाले आहेत. या पार्श्वभूमीवर अचानक मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अयोध्या आणि राम मंदिर परिसराची हवाई पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतला. 

अयोध्येत येणाऱ्या भाविकांच्या संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे

मुख्यमंत्री योगी हेलिकॉप्टरने अयोध्येत पोहोचले. रामजन्मभूमी आणि हनुमानगढीची हवाई पाहणी केली. मौनी अमावास्येनंतर अयोध्येत येणाऱ्या भाविकांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. तसेच आगामी वसंत पंचमी पर्वाच्या निमित्ताने सर्व गोष्टींचा आढावा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घेतला. सलग आणि सातत्याने अयोध्येत येणाऱ्या भाविकांच्या संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. दुसरीकडे एडीजी झोन, आयुक्त आणि पोलीस यांनी वसंत पंचमीच्या निमित्ताने सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला आणि गर्दीच्या ठिकाणांची पायीच पाहणी केली.

गेल्या २ दिवसांत ६ लाखांहून अधिक भाविकांनी घेतले रामललाचे दर्शन

गेल्या २ दिवसांत ६ लाखांहून अधिक भाविकांनी राम मंदिरात रामललाचे दर्शन घेतले. रामजन्मभूमी परिसराचे एसपी बलरामाचारी दुबे यांनी सांगितले की, मौनी अमावस्या उत्सवानिमित्त ३ लाख ८ हजार रामभक्तांनी दर्शन घेतले. गेल्या काही दिवसांपासून पहाटे ५ वाजल्यापासून रामललाचे दर्शन सुरू होते आणि रात्री ११ वाजता राम मंदिर भाविकांसाठी बंद केले जाते. वाढीव वेळेमुळे अधिकाधिक भाविकांना दर्शनाचा लाभ मिळत आहे. 
 

Web Title: 70 lakh people came in ayodhya in last 3 days and cm yogi adityanath took a review from helicopter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.