बापरे! 'या' जिल्ह्यात एक, दोन नव्हे, तर तब्बल ७० हजार 'विजय माल्ल्या'; बँका शोधून शोधून दमल्या
By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2022 12:13 PM2022-03-30T12:13:03+5:302022-03-30T12:15:19+5:30
बँकांकडून 'विजय माल्ल्यां'चा शोध सुरू; कर्मचाऱ्यांना प्रचंड मनस्ताप
कानपूर: देशातील अनेक बँकांमध्ये मार्च एंडची तयारी सुरू आहे. कर्जाची परतफेड न करणाऱ्या ग्राहकांचा शोध बँकांकडून सुरू आहे. अनेकांनी लहान रकमेची कर्ज फेडलेली नाहीत. कर्ज बुडित खात्यानं गेल्यानं बँका वैतागल्या आहेत. कानपूरमधील ७० हजार ग्राहकांनी कर्ज फेडलेलं नाही. त्यामुळे बँका संकटात सापडल्या आहेत. ७० हजार ग्राहकांपैकी अनेकांनी पर्सनल, वाहनांसाठी कर्ज घेतलं आहे. तर काहींनी सरकारी योजनांच्या अंतर्गत कर्ज घेतलं आहे.
आर्थिक वर्ष संपत आल्यानं बँका कर्जाचा लेखाजोखा मांडत आहेत. मात्र कानपुरातील जवळपास ७० हजार जणांनी बँकांची झोप उडवली आहे. जिल्ह्यातील विविध बँकांकडून २.४ लाख जणांनी कर्ज घेतलं आहे. कर्जाची रक्कम २ लाखांच्या आत आहे. यापैकी ७० हजार जणांनी कर्जाचे तीन ते पाच हफ्ते भरलेले नाहीत. यातील बहुतांश जणांनी पर्सनल लोन घेतलं आहे. या कर्जासाठी काहीच तारण ठेवलं जात नाही. त्यामुळे ही रक्कम वसूल कशी करायची असा प्रश्न बँकांना पडला आहे. कर्ज घेतलेल्या अनेकांनी नोकरी बदलली आहे. काहींनी शहरच सोडलं आहे. त्यामुळे त्यांचा शोध घेण्याचं आव्हान बँकांसमोर आहे.
छोट्या रकमेच्या कर्जाची गॅरंटी नाही
काही सरकारी योजनांमधून १० ते ५० हजार रुपयांचं कर्ज लाभार्थ्यांना मिळतं. त्यांच्याकडून कोणतीही गॅरंटी घेतली जात नाही. अशा व्यक्तींकडून कर्जाची वसुली करणं अवघड जातं. यातील बहुतांश लोक भाड्याच्या घरात राहतात. कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे या व्यक्ती घरं बदलत असतात. त्यामुळे अशा व्यक्तींना दिलेल्या कर्जाची वसुली करणं बँकांसाठी आव्हानात्मक असतं.