'700 वर्षांपूर्वी दिल्लीचा सुलतान मोहम्मद बिन तुघलकने केली होती नोटाबंदी'
By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2017 05:41 AM2017-11-15T05:41:41+5:302017-11-15T11:27:12+5:30
'मोहम्मद बिन तुघलकने 700 वर्षांपूर्वी नोटाबंदी केली होती. अनेक असे राजे होते ज्यांनी स्वतःची नवी मुद्रा आणली. काहींनी नवीन मुद्रा चलनात आणण्यासोबत जुनी मुद्रा देखील चलनात कायम ठेवली. पण 700 वर्षांपूर्वी सुलतान तुघलकने नवी मुद्रा चलनात आणली आणि जुनं चलन बाद ठरवलं.
अहमदाबाद - देशाची अर्थव्यवस्था आणि केंद्र सरकारच्या कारभारावरून मोदी सरकारवर टीका करणारे माजी केंद्रीय अर्थमंत्री व भारतीय जनता पक्षाचे नेते यशवंत सिन्हा यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर बोच-या शब्दात निशाणा साधला आहे. नोटाबंदीवरून बोलताना सिन्हा यांनी पंतप्रधान मोदींची तुलना मोहम्मद बिन तुघलक याच्यासोबत केली. नोटाबंदीवर टीका करताना नोटाबंदीमुळे अर्थव्यवस्थेला 3.75 लाख कोटी रूपयांचं नुकसान झालं, असं वाजपेयी सरकारमध्ये अर्थमंत्री राहिलेले सिन्हा म्हणाले.
'नवभारत टाइम्स'ने दिलेल्या वृत्तानुसार, पंतप्रधान मोदींची तुलना 14 व्या शतकातील दिल्लीचा सुलतान मोहम्मद बिन तुघलक याच्यासोबत करताना सिन्हा म्हणाले, 'मोहम्मद बिन तुघलकने 700 वर्षांपूर्वी नोटाबंदी केली होती. अनेक असे राजे होते ज्यांनी स्वतःची नवी मुद्रा आणली. काहींनी नवीन मुद्रा चलनात आणण्यासोबत जुनी मुद्रादेखील चलनात कायम ठेवली. पण 700 वर्षांपूर्वी सुलतान तुघलकने नवी मुद्रा चलनात आणली आणि जुनं चलन बाद ठरवलं'.
कोण होता तुघलक -
14 व्या शतकात काही काळासाठी दिल्लीच्या गादीवर राज्य करणा-या मोहम्मद बिन तुघलकला त्याच्या वादग्रस्त निर्णयांमुळे ओळखलं जातं. अचानक राजधानी दिल्लीऐवजी दौलताबाद करण्याचा निर्णय त्याने घेतला होता. तसंच सोनं किंवा चांदीचं नाणं सुरू असताना तांब्याच्या नाण्याचं चलन तुघलकनेच सुरू केलं होतं.
नोटबंदी आणि जीएसटी यासारख्या मुद्दयांवरून सिन्हा गेल्या अनेक दिवसांपासून सिन्हा केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटलींवर टीका करत आहेत. जीएसटी लागू करताना डोक्याचा वापर केला नाही असं ते म्हणाले होते.