महिन्याला 7 हजार पगार अन् भरायचे 3 कोटी; प्राप्तिकर खात्याच्या कारभारामुळे तरुण चिंतेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2020 06:53 IST2020-01-17T02:51:24+5:302020-01-17T06:53:46+5:30
ही रक्कम न भरल्यास तुमच्या मालमत्तेवर टाच आणण्यात येईल, असे प्राप्तिकर खात्याने त्याला कळविले आहे.

महिन्याला 7 हजार पगार अन् भरायचे 3 कोटी; प्राप्तिकर खात्याच्या कारभारामुळे तरुण चिंतेत
भोपाळ : दरमहा अवघे सात हजार रुपये उत्पन्न असलेल्या एका तरुणाला १३४ कोटी रुपयांच्या आर्थिक व्यवहारांचा खुलासा करण्याच्या सूचना देतानाच प्राप्तिकर खात्याने त्याला ३ कोटी ४९ लाख रुपये भरण्यासाठी नोटीस पाठवली आहे.
मध्य प्रदेशातील भिंड जिल्ह्यातील हा तरुण असून, रवी गुप्ता असे त्याचे नाव आहे. प्राप्तिकर खात्याच्या नोटीसमुळे तो हबकून गेला आहे. मात्र त्याने दाद मागायला सुरुवात केली आहे. त्याला २0११-१२ या काळातील १३४ कोटी रुपयांच्या आर्थिक व्यवहाराविषयी करण्यात आलेली विचारणा पॅन क्रमांकाच्या आधारे आहे. त्या काळात रवी गुप्ता यांचे मासिक उत्पन्न केवळ सात हजार रुपये होते. प्राप्तिकर खात्याची नोटीस पाहून रवी गुप्ता घाबरून गेला आहे. त्याला अशा कोणत्याही आर्थिक व्यवहारांची माहिती नाही. आपल्या नावाने बँक खाते उघडून आणि पॅन तयार करून कोणी तरी हे केले असावे, असे त्याचे म्हणणे आहे.
ही नोटीस मिळाल्यानंतर हा प्रकार कसा घडला, याचा त्यानेच शोध घ्यायला सुरुवात केली. मेहुल चोक्सी व नीरव मोदी यांच्याशी संबंध असलेल्या गुजरातमधील हिरे व्यापार करणाऱ्या कंपनीने हे व्यवहार केल्याचे आढळून आले, असे त्याने सांगितले. हे व्यवहार झाले, तेव्हा मी जेमतेम २१ वर्षांचा होतो आणि त्या काळात कधीही मुंबईला गेलो नव्हतो, असेही गुप्ता म्हणाला.
तरुणाची धावाधाव
ही रक्कम न भरल्यास तुमच्या मालमत्तेवर टाच आणण्यात येईल, असे प्राप्तिकर खात्याने त्याला कळविले आहे. मात्र त्याच्याकडे फारशी मालमत्ता वा संपत्तीही नाही. आपण यासंदर्भात मध्य प्रदेश व महाराष्ट्र पोलिसांच्या सायबर सेलला, तसेच पंतप्रधान कार्यालयाला पत्र लिहिले आहे. या प्रकरणातून आपली सुटका करण्यात यावी, असेही त्याने प्राप्तिकर विभागाला कळविले आहे.