71 वर्षांमध्ये चार रेल्वे मंत्र्यांचा केला अपघातांनी घात
By अोंकार करंबेळकर | Published: August 23, 2017 05:41 PM2017-08-23T17:41:35+5:302017-08-23T17:51:44+5:30
रेल्वे अपघातांची जबाबदारी घेऊन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी राजीनामा दिल. त्यांच्याप्रमाणेच याआधीही तीन रेल्वे मंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामे दिले होते. यामध्ये लालबदाहूर शास्त्री, नितिश कुमार आणि ममता बॅनर्जी यांचा समावेश आहे.
मुंबई, दि.23- आज रेल्वे अपघातांची जबाबदारी घेऊन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी राजीनामा दिला आहे. त्यांच्याप्रमाणेच याआधीही तीन मंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामे दिले होते. यामध्ये लालबदाहूर शास्त्री, नितिश कुमार आणि ममता बॅनर्जी यांचा समावेश आहे. भारताचे पहिले रेल्वेमंत्री म्हणून असफ अली यांनी 2 सप्टेंबर 1946 साली शपथ घेतली स्वातंत्र्यप्राप्ती आधी अंतरिम सरकारमध्ये त्यांनी रेल्वे मंत्रालय सांभाळले. 14 ऑगस्ट 1947 पर्यंत त्यांनी या मंत्रालयाचा कारभार पाहिला. अखंड भारताचे म्हणजे सध्याचा पाकिस्तान, भारत आणि बांगलादेश अशा विशाल भूभागावरील रेल्वे त्यांच्या अखत्यारित होती. इतका मोठा व्याप सांभाळणारे ते एकमेव मंत्री असावेत. असफ अली हे स्वातंत्र्यसैनिक अरुणा असफ अली यांचे पती होते.
स्वतंत्र भारताचे तिसरे रेल्वेमंत्री म्हणून लालबहादूर शास्त्री यांनी 13 मे 1952 रोजी कार्यभार स्वीकारला, त्यानंतर ते 7 डिसेंबर 1956 पर्यंत पदावरती होते. चेन्नईपासून 174 किमी अंतरावर अरियालूर येथे झालेल्या अपघातामध्ये 152 लोकांनी प्राण गमावले होते. या अपघाताची जबाबदारी स्वीकारत शास्त्री यांनी राजीनामा दिला होता. तत्पुर्वी मेहबूब नगर येथील अपघाताची जबाबदारी स्वीकारत त्यांनी पंतप्रधान पं. नेहरु यांच्याकडे राजीनामा देऊ केला होता. मात्र अरियालूर अपघाताच्यावेळेस मला हे दुःख सहन होत नाही असे सांगत त्यांनी मला कृपया बाजूला होण्याची परवानगी द्या अशी विनंती पंतप्रधानांकडे केली.
सुरेश प्रभूंनी रेल्वे अपघाताची जबाबदारी स्वीकारली! पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे सादर केला राजीनामा
लालबहादूर शास्त्री यांच्या कार्यकाळानतंरही रेल्वे अपघात होतच होते मात्र कोणत्याही मंत्र्याने राजीनामा देऊ केला होता. पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्याकडे तत्कालीन रेल्वेमंत्री नितिशकुमार यांनी राजीनामा देऊ केला होता. नितिशकुमार 19 मार्च 1998 ते 5 ऑगस्ट 1999 आणि 20 मार्च 2001 ते 22 मे 2004 असे दोनवेळा रेल्वेमंत्री होते. ऑगस्ट 1999 साली आसाममध्ये झालेल्या गैसल रेल्वे अपघातामध्ये 260 लोक मृत्युमुखी पडले होते. या अपघाताची नैतिक जबाबदारी घेत नितिशकुमार यांनी राजीनामा दिला होता. नितिशकुमार यांनी या काळात रेल्वे मंत्रालयात विविध सुधारणा घडवून आणल्या होत्या. त्यांना दोन वर्षांनी पुन्हा रेल्वे मंत्रालयाची जबाबदारी मिळाली.
नितिशकुमार यांच्या रेल्वे मंत्रीपदाच्या पहिल्या कार्यकाळानंतर काही महिने रेल्वेमंत्रालयाची जबाबदारी राम नाईक यांच्याकडे होती. त्यानंतर ममता बॅनर्जी यांनी या पदाचा भार स्वीकारला. 2001 साली पंजाबमध्ये झालेल्या रेल्वे अपघातात 43 लोकांचे प्राण गेल्यावर, त्या घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारत बॅनर्जी यांनी राजीनामा देऊ केला. त्यावेळेस पत्रकारांशी बोलताना त्या म्हणाल्या होत्या, अपय़श हे अपयश असते, त्यासाठी कोणतीही कारणे मी देत नाही, मी अपघाताची नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा देत आहे. मात्र पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी तो स्वीकारला नव्हता. त्यानंतर 2009 साली संयुक्त पुरोगामी आघाडी म्हणजेच युपीएचे दुसरे सरकार आल्यानंतर त्या पुन्हा रेल्वेमंत्री झाल्या. 26 मे 2009 ते 19 मे 2011 या काळात त्या रेल्वेमंत्री होत्या. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदी निवडून गेल्यामुळे त्यांनी हे पद सोडले आणि पक्षाचे दुसरे खासदार दिनेश त्रिवेदी यांच्याकडे त्यांनी मंत्रीपदाची जबाबदारी दिली. रालोआ आणि संपुआ अशा दोन्ही आघाडी सरकारांमध्ये रेल्वे मंत्रालय सांभाळणाऱ्या त्या एकमेव मंत्री आहेत.