७१२ कोटी रुपयांचा चिनी घोटाळा उघड; पार्ट टाइम कामातून पैशाचे आमिष
By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2023 09:11 AM2023-07-24T09:11:18+5:302023-07-24T09:11:35+5:30
ई-कॉमर्स वेबसाइटवर विविध उत्पादनांचे बनावट रिव्ह्यू टाकण्याचा एक मोठा चिनी घोटाळा उघडकीस आला आहे.
हैदराबाद : ई-कॉमर्स वेबसाइटवर विविध उत्पादनांचे बनावट रिव्ह्यू टाकण्याचा एक मोठा चिनी घोटाळा उघडकीस आला आहे. हा तब्बल ७१२ कोटी रुपयांचा घोटाळा असून देशभरातून याप्रकरणी ९ जणांना अटक करण्यात आली आहे.
चीनमध्ये बसलेल्या लोकांच्या इशाऱ्यावर हे लोक काम करीत होते. या प्रकरणाचा हिजबुल्लाह या दहशतवादी संघटनेसोबतही संबंध असल्याचे आढळले आहे. त्यादृष्टीने तपास करण्यात येत आहे.
हैदराबादच्या पोलिसांनी एका फसवणुकीच्या प्रकरणात तक्रार दाखल केली होती. त्याच्या तपासातून हा संपूर्ण घोटाळा उघडकीस आला.
कशी होत असे फसवणूक?
लोकांना रिव्ह्यू करण्यााठी पार्ट टाइम कामाची ऑफर मिळते. त्यावर विश्वास ठेवून लोक नोंदणी करतात.
या लोकांकडून सुरुवातीला गुंतवणुकीच्या नावाखाली हजार रुपये मागितले जातात. तक्रारकर्त्या व्यक्तीला सुरुवातीला ८०० रुपये नफा झाला. त्यानंतर त्याने २५ हजार रुपये गुंतविले. त्यावर २० हजारांचा फायदा झाला. मात्र, ही रक्कम काढण्याची परवानगी मिळाली नाही. उलट आणखी पैसे मागितले. असे करून त्याने २८ लाख रुपये गुंतविले; पण हे पैसे त्याला परत मिळाले नाही.