राज्यातील सिंचन प्रकल्पांसाठी ७१८० कोटी द्या , शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांसाठी राज्यपाल विद्यासागर राव यांची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2017 04:13 AM2017-10-16T04:13:08+5:302017-10-16T04:13:35+5:30
राज्यातील १४ शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांतील ११४ सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी ७१८० कोटी रुपयांची आर्थिक मदत करावी, अशी मागणी महाराष्ट्राचे राज्यपाल सी. एच. विद्यासागर राव यांनी केंद्राकडे केली आहे.
- हरीष गुप्ता
नवी दिल्ली : राज्यातील १४ शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांतील ११४ सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी ७१८० कोटी रुपयांची आर्थिक मदत करावी, अशी मागणी महाराष्ट्राचे राज्यपाल सी. एच. विद्यासागर राव यांनी केंद्राकडे केली आहे. गंभीर कृृषी संकटामुळे या प्रस्तावाकडे ‘विशेष प्रकरण’ म्हणून पाहावे, अशी विनंतीही त्यांनी केली आहे.
राष्ट्रपती भवनात झालेल्या राज्यपालांच्या संमेलनादरम्यान त्यांनी हा प्रश्न उपस्थित केला. महाराष्ट्रातील दूरवरच्या आदिवासी भागात मोबाइल आणि टेलिफोनच्या कनेक्टिव्हिटीचा मुद्दा उपस्थित करून ते म्हणाले की, मोबाइल कनेक्टिव्हिटी नसल्याने लोकांना चिकित्सा आणि आपत्कालीन अॅम्ब्युलन्स सेवा उपलब्ध करून देण्यात अडथळे येत आहेत. विशेषत: गर्भवती महिलांना सेवा देण्याबाबत या अडचणी येत आहेत. ते म्हणाले की, हा मुद्दा राज्याच्या नंदुरबार, गडचिरोली, नांदेड आणि अमरावती जिल्ह्यात तीव्र आहे.
महाराष्ट्रातील राजभवनात त्यांच्या पुढाकारातून केलेल्या एका कामाचा उल्लेख करून ते म्हणाले की, एक मेगावॅटचा सौरऊर्जा प्रकल्प पुण्यातील राजभवनात स्थापन करण्यात आला आहे. देशातील सर्व राजभवनांपैकी हा सर्वांत मोठा प्रकल्प आहे. पहिल्या विश्व युद्धातील एका भुयाराचा मुंबईतील राजभवनात शोध लागल्याचा संदर्भ देऊन ते म्हणाले की, हे भुयार संरक्षित केले जात असून, या ठिकाणी आधुनिक संग्रहालय विकसित करण्यात येणार आहे. स्वातंत्र्याच्या आंदोलनातील महाराष्ट्राचा इतिहास, संस्कृती आणि सहभागाचे प्रदर्शन यात असेल.