72 तासांत पोलिसांनी लावला 27 बेपत्ता मुलींचा शोध
By Admin | Published: April 18, 2017 02:12 PM2017-04-18T14:12:38+5:302017-04-18T14:12:38+5:30
पोलीस महासंचालकांनी सर्व प्रलंबित प्रकरणं बाहेर काढत परिसरातील वेगवेगळ्या ठिकाणाहून बेपत्ता झालेल्या 39 मुलींचा तात्काळ शोध घेण्याचा आदेश दिला होता
>ऑनलाइन लोकमत
लखनऊ, दि. 18 - पोलिसांनी मनावर घेतलं तर वेळेच्या आधीच आपलं काम पुर्ण करु शकतात. याचं एक उत्तम उदाहरण शाहजहानपूर पोलिसांनी दिलं आहे. वरिष्ठ अधिका-याकडून मिळालेल्या आदेशानंतर पोलिसांनी एका रात्रीत शाहजहानपूरमधून बेपत्ता झालेल्या मुलींचा शोध लावला. पोलीस महासंचालक के बी सिंह यांनी सर्व प्रलंबित प्रकरणं बाहेर काढत पोलिसांना परिसरातील वेगवेगळ्या ठिकाणाहून बेपत्ता झालेल्या 39 मुलींचा तात्काळ शोध घेण्याचा आदेश दिला होता. पोलिसांनी ताबडतोब कारवाई करत काही तासांतच 27 बेपत्ता मुलींचा शोध लावला.
पोलिसांनी फक्त 72 तासांत 27 मुलींचा शोध लावला असून अजून 12 मुलींचा शोध लागणं बाकी आहे. परिसरातील सर्व पोलिसांना "करा किंवा मरा" असा आदेशच देण्यात आला होता. आपल्या कामात हलगर्जीपणा करणा-या आठ पोलीस उपनिरीक्षकांची आधीच बदली करण्यात आली आहे, तर 24 पोलीस अधिका-यांना 48 तासांच्या आत चांगली कामगिरी करुन दाखवा असं सांगण्यात आलं आहे.
शाहजहानपूर परिसरात अपहरणाची 39 प्रकरणं प्रलंबित होती. पीडित मुलींच्या नातेवाईकांनी वारंवार तक्रार करुनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं होतं. 2016 पासून ही प्रकरणं प्रलंबित होती. यामध्ये एका अल्पवयीन मुलीचाही समावेश होता, जे प्रकरण 2015 पासून प्रलंबित होतं. के बी सिंह यांनी दिलेल्या आदेशानंतर या अल्पवयीन मुलीच्या तपासाला गती मिळाली आणि तिचा शोध लावण्यात आला.
पोलिसांनी फक्त आसपासच्या परिसरातूनच नाही तर दूरच्या गाव, शहरांमधूनही बेपत्ता मुलींचा शोध लावला. दोन मुलींना 30 किमी लांब, तर इतर तिघींना 55 किमी लांब परिसरातून वाचवण्यात आलं. एका मुलीला चंदीगड तर दुसरीला अलाहाबादमधून परत आणण्यात आलं.
बेपत्ता मुलींचा शोध घेण्यासाठी पोलिसांना पुर्ण सूट दिली गेली होती असं एका अधिका-याने सांगितलं आहे. लवकरात लवकर मुलींचा शोध घेत त्यांच्या कुटुंबियांकडे त्यांना पोहचवा असा आदेश त्यांना देण्यात आला होता.
एका अधिका-याने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितलं आहे की, "सुटका करण्यात आलेल्या अनेक मुली अल्पवयीन आहेत. यामधील अनेक मुली स्वत:हून घरातून पळून गेल्या होत्या. लग्न करण्याच्या हेतूने घरातून पळालेल्या या मुली ज्यांच्यासोबत गेल्या होत्या त्यांच्याविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल केला जाईल".