१६२ जणांचे कुटुंबप्रमुख झिओना झाले ७२ वर्षांचे!
By admin | Published: July 22, 2016 04:30 AM2016-07-22T04:30:43+5:302016-07-23T03:10:27+5:30
मिझोराममधील झिओना नावाच्या व्यक्तीचा ७२ वा वाढदिवस गुरुवारी मोठ्या धुमधडाक्यात साजरा करण्यात आला.
आयझॉल: जगतील सर्वात मोठ्या एकत्र कुटुंबाचा प्रमुख अशी ओळख असलेल्या मिझोराममधील झिओना नावाच्या व्यक्तीचा ७२ वा वाढदिवस गुरुवारी मोठ्या धुमधडाक्यात साजरा करण्यात आला. झिओना यांना ३८ बायका, ८९ मुले आणि त्याहूनही अधिक नातवंडे आहेत.
झिओना हे मिझोराममधील ‘चाना’ या धार्मिक पंथाचे प्रमुख आहेत. हा पंथ त्यांच्या वडिलांनी १९४२ मध्ये स्थापन केला व त्यांच्याच चाना या नावाने हा पंथ पुढे सुरु आहे. मिझोराममध्ये या पंथांचे २,१०० अनुयायी आहेत. या पंथाच्या रुढी-परंपरांनुसार एकाच पुरुषाने कितीही बायकांशी विवाह करण्याची मुभा आहे.
झिओना यांनी सन १९४९ मध्ये वयाच्या १५ व्या वर्षी त्यांच्या पहिल्या पत्नीशी विवाह केला. त्यांचा ३८ वा विवाह वयाच्या साठाव्या वर्षी सन २००४ मध्ये झाला. बायका, मुले आणि नातवंडांचे मिळून त्यांचे १६२ जणांचे एकत्र कुटुंब असून ते मध्य मिझोरमच्या सेरच्चिप जिल्ह्यात बकतवांग त्लांगनुआम गावात राहते. ‘चुआन थुर रान’ (नव्या पिढीचे घर) हे त्यांचे गावातील चार मजली निवासस्थान हे मिझोरामला
येणाऱ्या पर्यटकांचे खास आकर्षण आहे. (वृत्तसंस्था)
>बकतवांग त्लांगनुआम या गावात झिओना यांच्या वाढदिवसानिमित्त गुरुवारी दिवसभर नाच-गाणी आणि मिरवणुकांनी आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी गायली गेलेली सर्व गाणी स्वत: झिओना यांनीच रचलेली होती. यावेळी पंथातील सर्व अनुयायांनी सुग्रास मेजवानीही देण्यात आली.