75 लाख लोक झाले एप्रिलमध्ये बेरोजगार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2021 01:41 AM2021-05-05T01:41:54+5:302021-05-05T01:42:20+5:30
चार महिन्यांतील उच्चांक : शहरी भागात दर जास्त
नवी दिल्ली : कोविड-१९ साथीच्या दुसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी स्थानिक पातळीवर लावण्यात आलेल्या निर्बंधांमुळे एप्रिलमध्ये ७५ लाख लोक बेरोजगार झाले आहेत. त्याबरोबर देशातील बेरोजगारीचा दर ८ टक्के झाला असून, बेरोजगारीने कॅलेंडर वर्षातील चार महिन्यांमधील उच्चांक गाठला आहे.
‘सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी’ने (सीएमआयई) एका अहवालात ही माहिती दिली आहे. ‘सीएमआयई’चे व्यवस्थापकीय संचालक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) महेश व्यास यांनी सांगितले की, आगामी काळातही रोजगाराच्या बाबतीत आव्हानात्मक परिस्थिती राहील. स्थानिक पातळीवर लावण्यात आलेल्या लॉकडाऊनसदृश निर्बंधांमुळे एप्रिलमध्ये देशात ७५ लाख लोक बेरोजगार झाले आहेत. केंद्र सरकारच्या आकडेवारीनुसार, राष्ट्रीय बेरोजगारीचा दर एप्रिलमध्ये ७.९७ टक्के झाला आहे. शहरी भागातील बेरोजगारीचा दर ९.७८ टक्के, तर ग्रामीण भागात ७.१३ टक्के आहे. मार्चमध्ये राष्ट्रीय बेरोजगारीचा दर ६.५० टक्के होता.
व्यास यांनी सांगितले की, कोविड-१९ साथ सर्वोच्च पातळीवर केव्हा पोहोचेल, याची मला माहिती नाही. तथापि, यामुळे रोजगारावर दबाव राहील, हे नक्की. पहिल्या लॉकडाऊनच्या वेळी परिस्थिती जितकी वाईट होती, तितकी यावेळी नाही. गेल्या लाॅकडाऊनच्या काळामध्ये बेरोजगारीचा दर २४ टक्क्यांवर गेला होता.