राष्ट्रपती निवडणारे ७५% कोट्यधीश

By admin | Published: July 16, 2017 11:41 PM2017-07-16T23:41:42+5:302017-07-16T23:41:42+5:30

पुढील आठवड्यातील राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी होणार असलेल्या एकूण मतदानापैकी ७५ टक्के मतदान कोट्यधीश

75% of the President's Choice Selectors | राष्ट्रपती निवडणारे ७५% कोट्यधीश

राष्ट्रपती निवडणारे ७५% कोट्यधीश

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : पुढील आठवड्यातील राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी होणार असलेल्या एकूण मतदानापैकी ७५ टक्के मतदान कोट्यधीश असलेले आमदार आणि खासदार करणार आहेत. ३,४६0 आमदार-खासदारांनी आपली संपत्ती १ कोटीपेक्षा जास्त असल्याचे घोषित केलेले आहे.
असोसिएशन फॉर डेमॉक्रॅटिक रिफॉर्म्स (एडीआर) या संस्थेने दिलेल्या महितीनुसार, राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीतील एकूण १0,९१,४७२ मतांपैकी ८,१८,७0३ मते कोट्यधीश आमदार-खासदार टाकणार आहेत. एकूण मतांच्या तुलनेत कोट्यधीशांच्या मतांचे प्रमाण ७५ टक्के इतके भरते.
एडीआर आणि नॅशनल इलेक्शन वॉच (एनईडब्ल्यू) यांनी निवडणूक आयोगाकडील शपथपत्रांतील मालमत्ताविषयक आकडेवारीचे विश्लेषण करून हा निष्कर्ष काढला आहे. या संस्थांनी ४,८९६ पैकी ४,८५२ शपथपत्रांचे विश्लेषण केले आहे. निवडणुकीच्या वेळी उमेदवार म्हणून अर्ज भरताना ही शपथपत्रे दाखल करण्यात आली आहेत.
विश्लेषण करण्यात आलेल्या शपथपत्रांपैकी ७७४ शपथपत्रे खासदारांची तर ४,0७८ शपथपत्रे आमदारांची आहेत.
१७ जुलै रोजी राष्ट्रपतीपदासाठी निवडणूक होत आहे. देशातील खासदार आणि आमदार हे या निवडणुकीत मतदार असतात. ही निवडणूक थेट मत पद्धतीने होत नाही. निर्वाचन मंडळ (इलेक्ट्रोरल कॉलेज) पद्धतीने होते. सर्व आमदार खासदारांच्या मतांचे मूल्य १0,९१,४७२ मते इतके आहे.
एका खासदाराच्या मताचे मूल्य ७0८ मते इतके गृहीत धरले जाते. आमदारांच्या मतांचे मूल्य राज्यनिहाय बदलते. राज्य विधानसभेची सदस्य संख्या आणि राज्याची लोकसंख्या यानुसार आमदारांच्या मतांची किंमत ठरते.
विश्लेषण करण्यात आलेल्यांपैकी ३,३६0 आमदार-खासदार कोट्यधीश आहेत. एकूण आमदार-खासदारांच्या तुलनेत कोट्यधीश आमदार-खासदारांचे प्रमाण सुमारे ७१ टक्के इतके आहे. त्यात लोकसभेचे ४४५ सदस्य, राज्यसभेचे १९४ सदस्य आणि राज्य विधानसभांचे २,७२१ सदस्य यांचा समावेश आहे.

Web Title: 75% of the President's Choice Selectors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.