ऐकावं ते नवलच! ७५ वर्षीय शेतकऱ्याच्या खात्यात आले १ कोटी अन् बळीराजाचंच वाढलं टेन्शन
By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2023 01:09 PM2023-12-30T13:09:23+5:302023-12-30T13:10:19+5:30
७५ वर्षीय संदीप मंडल यांनी आपल्या मुलाला एसबीआय बँकेत पासबुक अपडेट करण्यासाठी पाठवले होते.
बँक कर्मचाऱ्यांची एक चूक किती महागात पडू शकते याचा प्रत्यय अनेकदा पाहायला मिळाला आहे. उत्तर प्रदेशातील अलीगढनंतर आता बिहारमधील एका शेतकऱ्याला देखील कर्मचाऱ्यांच्या एका चुकीमुळे रातोरात कोट्यवधी बनवले. येथील भागलपूरमधील गरीब शेतकरी रातोरात करोडपती झाला अन् एकच चर्चा रंगली. भागलपूरच्या एका गरीब शेतकऱ्याच्या खात्यात एक कोटी रुपये आले. मग बँकेच्या अधिकाऱ्यांनी तातडीने शेतकऱ्याचे खाते गोठवले. खरं तर ७५ वर्षीय संदीप मंडल यांनी आपल्या मुलाला एसबीआय बँकेत पासबुक अपडेट करण्यासाठी पाठवले होते.
बँकेच्या कर्मचार्यांनी त्यांना सांगितले की कुठून तरी खात्यात एक कोटी रुपये आले आहेत. या कारणास्तव खाते गोठवण्यात आले आहे. हे ऐकून संदीप मंडल यांचा मुलगा स्तब्ध झाला. तो घरी परतला आणि त्याने वडिलांना या प्रकरणाची माहिती दिली. ज्यांच्या खात्यात ही रक्कम आली ते शेतकरी संदीप मंडल यांनी सांगितले की, त्यांच्या मुलाने खात्यात एक कोटी रुपये असल्याचे सांगताच त्यांनी बँकेत धाव घेतली. बँक मॅनेजरकडून माहिती घेतली असता त्यांनी सांगितले की त्यांचे खाते गोठवण्यात आले आहे. या संदर्भात सायबर पोलीस ठाण्यात जाऊन अर्ज करा. तिथून अहवाल आल्यावरच पुढील कार्यवाही केली जाईल असे बँकेकडून सांगण्यात आले.
बळीराजाचं वाढलं टेन्शन
शेतकरी संदीप मंडल यांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या एसबीआय बँक खात्यात फक्त त्यांची वृद्धापकाळ पेन्शन आणि प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचे पैसे येतात. एवढी मोठी कोटींची रक्कम त्यांच्या संमतीशिवाय खात्यात वर्ग करण्यात आली आहे. ही मोठी रक्कम अचानक बँक खात्यात आल्याने गरीब शेतकऱ्यांच्या अडचणीतही वाढ झाली आहे. तसेच ते तणावात असल्याचे त्यांच्या मुलाने सांगितले.
तेलंगणा कनेक्शन असल्याची माहिती
या प्रकरणी वरिष्ठ पोलीस अधिकारी सुनील कुमार पांडे यांनी सांगितले की, तपासादरम्यान संबंधित शेतकऱ्याच्या खात्यात सुमारे एक कोटी रुपये आल्याचे आढळून आले. याप्रकरणी तेलंगणातील वारंगल जिल्ह्यातही एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची नोटीसही संबंधित बँकेला पाठवण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. तेलंगणा पोलिसांनी आमच्याशी संपर्क साधल्यास आम्ही त्यांना पूर्ण सहकार्य करू.