निवडणुकीपूर्वी तेलंगणात ट्रकमध्ये सापडले ७५० कोटी, पोलीस अवाक्, त्यानंतर समोर आली अशी माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2023 03:12 PM2023-10-19T15:12:28+5:302023-10-19T15:13:35+5:30
750 crore Cash Found in Telangana : तेलंगणामध्ये विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे. यादरम्यान, मंगळवारी पोलिसांना रात्री साडे दहाच्या सुमारास एक ट्रक सापडला. हा ट्रक अडवून तपासणी केली असता सारेच अवाक् झाले. या ट्रकमध्ये पोलिसांना तब्बल ७५० कोटी रुपयांची रोख रक्कम सापडली.
तेलंगणामध्ये विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे. निवडणुकीच्या तारखेची घोषणा झाल्यानंतर निवडणूक आयोगासह पोलिसांनीही सतर्कता वाढवली आहे. यादरम्यान, मंगळवारी पोलिसांना रात्री साडे दहाच्या सुमारास एक ट्रक सापडला. हा ट्रक अडवून तपासणी केली असता सारेच अवाक् झाले. या ट्रकमध्ये पोलिसांना तब्बल ७५० कोटी रुपयांची रोख रक्कम सापडली. गडवाल येथून जाणारा महामार्ग हा सर्वसाधारणपणे तस्करासांठीचं एक मोठं माध्यम मानला जातो. दरम्यान, काही तास चाललेल्या नाट्यमय घडामोडींनंतर हे प्रकरण शांत झाले. कारण ही रक्कम युनियन बँक ऑफ इंडियाची असल्याची माहिती समोर आली. ही रक्कम केरळमधून हैदराबाद येथे पाठवण्यात येत होती.
बुधवारी तेलंगाणाचे मुख्य निवडणूक अधिकारी विकास राज यांनी सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे. त्यांनी सांगितले की, बँक अधिकाऱ्यांनी दुजोरा दिल्यानंतर ट्रक पुढे रवाना करण्यात आला आहे. ७५० कोटी रुपये रोख रक्कम असलेला ट्रक काही तासांसाठी चर्चेचा विषय ठरला होता. मात्र अखेरीस हे चेस्ट टू चेस्ट मनी ट्रान्सफर असल्याचे आम्हाला समजले. त्याबाबत खात्री पटल्यावर पोलिसांनी ट्रकला पुढे जाण्यास परवानगी दिली.
सीईओंनी सांगितले की, राज्यात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक वाहनावर यंत्रणांची करडी नजर असून, प्रत्येक वाहनाची सावधानीपूर्वक तपासणी केली जात आहे. दरम्यान, दिल्लीमध्ये तेलंगणा विधानसभा निवडणुकीची घोषणा करण्यापूर्वी हैदराबादच्या दौऱ्यादरम्यान, मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी राज्य निवडणूक अधिकाऱ्यांना गोवा आणि इतर राज्यांमधून महबुगनगर येथून हैदराबादच्या मार्गावरून होणाऱ्या तस्करीवर अंकुश लावण्यास सांगितले होते. राज्य पोलिसांकडून रोख रकमेच्या झालेल्या कमी जप्तीबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. विरोधी पक्षांनी केलेल्या तक्रारींनंतर निवडणूक आयोगाने वरिष्ठ आयपीएस अधिकारी, चार जिल्हाधिकारी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची बदली केली होती.
निवडणूक आयोगासाठीचे तेलंगाणा पोलिसांचे नोडल अधिकारी, संजय कुमार जैन यांनी सांगितले की, रोख रक्कम नेत असलेल्या ट्रकला अडचणींचा सामना करावा लागला. त्यामुळे मदतीसाठी त्यांनी गडवाल पोलिसांना फोन केला. पोलिसांनी निरीक्षण केलं तेव्हा तिथे मोठ्या प्रमाणावर रोख रक्कम सापडली. त्यानंतर पडताळणीमध्ये कागदपत्रे आणि बँक तसेच रिझर्व्ह बँकेने दिलेल्या माहितीनुसार ट्रक पुढे रवाना करण्यात आला.