७५व्या प्रजासत्ताक दिनी ७५ रुपयांचे विशेष नाणे; ४० ग्रॅम असणार वजन
By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2024 08:15 AM2024-01-26T08:15:40+5:302024-01-26T08:41:10+5:30
प्रख्यात नाणेतज्ज्ञ सुधीर लुणावत यांनी सांगितले की, ७५ रुपयांच्या विशेष नाण्याचे वजन ४० ग्रॅम असणार आहे.
नवी दिल्ली : यंदा ७५वा प्रजासत्ताक दिन असून तो साजरा करण्यासाठी देशभरात जय्यत तयारी सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर यंदा २६ जानेवारीला, प्रजासत्ताकदिनी केंद्र सरकार ७५ रुपयांचे विशेष नाणे जारी करणार आहे.
प्रख्यात नाणेतज्ज्ञ सुधीर लुणावत यांनी सांगितले की, ७५ रुपयांच्या विशेष नाण्याचे वजन ४० ग्रॅम असणार आहे. ते शुद्ध चांदीपासून बनविण्यात येईल. या नाण्यावर एका बाजूला ७५ रुपये मूल्य लिहिलेले असून दुसऱ्या बाजूला नव्या व जुन्या संसद इमारतीचे चित्र असणार आहे. या नाण्यावर २०२४ या वर्षाचा उल्लेख तसेच ७५वा प्रजासत्ताक दिन असे हिंदी व इंग्लिशमध्ये लिहिलेले असेल. ७५ रुपयांचे हे विशेष नाणे केंद्र सरकारच्या मुंबईतील टांकसाळीत तयार केले जाणार आहे. या विशेष नाण्यावर अशोक स्तंभाचे चित्र, सत्यमेव जयते हे ब्रीदवाक्य, तर इंग्लिशमध्ये इंडिया व हिंदीमध्ये भारत असे लिहिलेले असेल.