७७ वर्षांचे आजोबा तब्बल ४७ व्यांदा देणार दहावीची परीक्षा
By admin | Published: March 4, 2016 10:00 AM2016-03-04T10:00:58+5:302016-03-04T13:08:41+5:30
राजस्थानमधील शिवचरण यादव हे ७७ वर्षीय इसम गेल्या ४६ वर्षांपासून १०वीची परीक्षा देत असून यावर्षी ते ४७ व्यांदा परीक्षेस बसणार आहेत.
Next
>ऑनलाइन लोकमत
जयपूर, दि. ४ - एखादी व्यक्ती कोणत्याही परीक्षेत किती वेळा नापास होऊ शकेल ? एक, दोन वा जास्तीत जास्त १० वेळा! पण राजस्थानमधील शिवचरण यादव हे ७७ वर्षीय इसम गेल्या ४६ वर्षांपासून १०वीची परीक्षा देत असून प्रत्येक वेळेस एखादा विषय राहिल्याने ते नापास झाले आहेत. यावर्षी १० मार्चपासून बोर्डाची परीक्षा सुरू होणार असून ते ४७ व्यांदा परीक्षा देणार आहेत. विशेष म्हणजे इतक्या वेळा अपयश मिळूनही ते खचले नसून कोणत्याही परिस्थितीत आपण या परीक्षेत उत्तीर्ण होऊच, असा निर्धार करून ते यंदाही रात्रभर जागून अभ्यास करण्यात मग्न आहेत.
राजस्थनाच्या अलवर जिल्ह्यातील खोहारी गावात राहणारे ७७ वर्षांचे शिवचरण यादव हे वाड-वडिलांच्या काळापासून असलेल्या घरात एकटेच राहतात. येत्या १० मार्चपासून राज्यातील दहावीची परीक्षा सुरू होणार असून यावर्षी तरी आपण नक्की यशस्वी होऊ असा विश्वास त्यांना आहे. आणि जोपर्यंत १० वी उत्तीर्ण होणार नाही, तोपर्यंत आपण लग्न करणार नाही असा 'पण' त्यांनी केला आहे.
शिवचरण सांगतात, '१९६८ साली मी पहिल्यांदा दहावीची परीक्षा दिली, मात्र त्यावर्षी मी नापास झालो. तेव्हापासून असंच सुरू आहे, मी काही विषयांत उत्तीर्ण होतो, पण माझे इतर काही विषय अडकतात. जर गणित आणि विज्ञानात चांगले मिळाले तर मी हिंदी आणि इंग्रजीत नापास होता. सुमारे २५ वर्षांपूर्वी म्हणजे १९९५ साली मी दहावी परीक्षा उत्तीर्ण होण्याच्या अगदीच नजीक पोहोचलो, त्यावर्षी मी जवळजवळ सर्व विषयांमध्ये उत्तीर्ण झालो, पण नेमका गणितात नापास झालो. पण तरीही मी प्रयत्न करणं सोडलं नाही. गेल्या ३० वर्षांपासून मी माझ्या पूर्वजांच्या घरात एकटाच राहत आहे. सरकारतर्फे वृद्धांना देण्यात येणारे पेन्शन आणि शेजारील मंदिरातून मिळणार प्रसाद यावर मी आत्तापर्यंत गुजारण केली. मात्र यावर्षी मी नक्कीच पास होईन' असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.