पंतप्रधान नरेंद्र मोदींची 41 महिन्यात 775 भाषणं, दर तीन दिवसाला करतात दोन भाषणं
By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2017 09:48 AM2017-10-24T09:48:05+5:302017-10-24T15:57:58+5:30
पंतप्रधानपद हाती घेतल्यापासून नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक महिन्यात जवळपास 19 भाषणं दिली आहेत. 26 मे 2014 रोजी पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर नरेंद्र मोदींनी दर तीन दिवसाला जवळपास दोन भाषणं केली आहेत.
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी एक उत्कृष्ट वक्ता असून, त्यांचं हेच कौशल्य त्यांना इतरांपासून वेगळं ठरवतं. पंतप्रधानपद हाती घेतल्यापासून नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक महिन्यात जवळपास 19 भाषणं दिली आहेत. 26 मे 2014 रोजी पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर नरेंद्र मोदींनी दर तीन दिवसाला जवळपास दोन भाषणं केली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणांवर विरोधक नेहमी टीका करत असतात. पण तसं पहायला गेल्यास मोदींची संवादफेक, लोकांशी संवाद साधण्याचं कौशल्य, लगेच भाषण देण्याची क्षमता हे त्यांच्या लोकप्रियतेचं एक मुख्य कारण आहे. पंतप्रधान झाल्यापासून नरेंद्र मोदींच्या आतापर्यंत 775 सार्वजनिक सभा पार पडल्या असून, त्यात भाषण दिलं आहे.
इकॉनॉमिक टाइम्सने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषण देण्याच्या क्षमेतवर अनेक नेत्यांशी चर्चा केली. आकडेवारीनुसार, पंतप्रधान मोदी दर महिन्याला किमान 17 भाषणं करतात, आणि ही भाषणं जवळपास अर्ध्या तासाहून जास्त असतात. राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांना याबद्दल विचारलं असता त्यांनी सांगितलं की, 'पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे भाषण देण्याचं एक कौशल्य आहे. कोणत्याही मुद्द्यावर ते मनापासून बोलतात. आपल्याकडे ज्ञान आणि मुद्दा एकत्रित करुन सर्वासमोर ठेवण्याचं कौशल्य हे त्यांना मिळालेलं गॉड गिफ्ट आहे'.
माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी आपल्या 10 वर्षांच्या कार्यकाळात 1401 भाषणं केली होती. याचाच अर्थ त्यांनी प्रतीमहिना 11 भाषणं केली. नरेंद्र मोदींचा अजून पाच वर्षांचा कार्यकाळही पुर्ण झालेला नाही, आणि त्यांनी माजी पंतप्रधानांपेक्षा जास्त भाषणं केली आहेत. मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान असताना राजकीय किंवा निवडणुकीत भाषण केल्यासंबंधीची माहिती मात्र मिळू शकली नाही.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जबरदस्त भाषण कौशल्याने काँग्रेस नेते मात्र जास्त प्रभावित झालेले दिसत नाहीत. काँग्रेस प्रवक्ता मनिष तिवारी याचं म्हणणं आहे की, 'पंतप्रधान मोदींची सर्वात मोठी समस्या ही आहे की, त्यांना वाटतं आपल्या भाषणात सरकार चालवण्याची क्षमता आहे. मोदींचं सर्व लक्ष आपल्या भाषणाकडे असून, सरकार चालवण्याकडे नाही यामध्ये आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही. देशाची पिछेहाट होत असताना, त्यांना कोणताच फरक पडत नाही'.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 2015 रोजी सर्वात जास्त भाषणं केली आहेत. 2015 मध्ये त्यांनी 264 भाषणं दिली. याचवर्षी पंतप्रधान मोदींनी सर्वात जास्त परदेश दौरे केले होते, आणि याचवेळी त्यांनी परदेशांमध्ये सार्वजनिक भाषणं केली होती. पंतप्रधान म्हणून मोदींनी परदेशात 164 भाषणं केली आहेत. एका वरिष्ठ सरकारी अधिका-याने दिलेल्या माहितीनुसार, 'पंतप्रधान नरेंद्र मोदी आपले विचार आणि अजेंडा सर्वांसमोर मांडण्यावर विश्वास ठेवतात. गरज पडल्यास ते दिवसाला दोन ते तीन सार्वजनिक सभा घेतात'.