७७८ आक्षेपार्ह आॅनलाईन पोस्ट ब्लॉक
By admin | Published: April 12, 2015 01:24 AM2015-04-12T01:24:27+5:302015-04-12T01:24:27+5:30
नव्या वर्षाची पहिली तिमाही नुकतीच संपली; मात्र पोलिसांनी एव्हाना ७७८ आक्षेपार्ह ‘आॅनलाईन पोस्ट’ ब्लॉक केल्या आहेत.
डिप्पी वांकानी - मुंबई
नव्या वर्षाची पहिली तिमाही नुकतीच संपली; मात्र पोलिसांनी एव्हाना ७७८ आक्षेपार्ह ‘आॅनलाईन पोस्ट’ ब्लॉक केल्या आहेत. हे प्रमाण गेल्या वर्षी ब्लॉक करण्यात आलेल्या अशा पोस्टच्या ८० टक्के एवढे आहे. दिवसेंदिवस वाढत चाललेल्या धर्मांध पोस्टस्ना आळा घालण्यासाठी सायबर सुरक्षा विभागाचे अधिकारी अहोरात्र काम करीत आहेत.
सीमेपलीकडील समाजकंटक फेसबुक, टिष्ट्वटर यासारख्या सोशल नेटवर्किंग साईटवर धार्मिक भावना दुखावणारा मजकूर टाकून जातीय तणाव भडकावण्याचा प्रयत्न करीत आहेत, असे सूत्रांनी सांगितले. २०१४ मध्ये पोलिसांच्या सोशल मीडिया लॅबने फेसबुक, टिष्ट्वटर व यूू ट्यूबवरील ११९२ आक्षेपार्ह व चिथावणीखोर पोस्ट ब्लॉक केल्या होत्या. यावर्षी मात्र ३१ मार्चपर्यंतच पोलिसांनी अशा ७७८ पोस्ट ब्लॉक केल्या आहेत. या पोस्ट भावना दुखावण्यास किंवा राज्यात दंगल उसळविण्यास कारणीभूत ठरण्याची शक्यता होती. यापैकी बहुतांश पोस्ट धर्मविरोधी होत्या. यात एकतर छायाचित्रांची मोडतोड (विद्रूपीकरण) करण्यात आली होती किंवा आक्षेपार्ह भाषेचा वापर करण्यात आला होता. अशा पोस्ट आॅनलाईन दिसताच त्या आणखी पसरण्यापूर्वीच आमचे पथक त्यांना ब्लॉक करते, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. काही घटक देशात धार्मिक तणाव वाढविण्याचा प्रयत्न करीत आहेत, असेही हा अधिकारी म्हणाला.
‘आम्ही विविध मापदंडांवर या पोस्टस्चे वर्गीकरण करतो. काही पोस्टमध्ये एखादी संघटना, राजकीय पक्ष किंवा नेत्यास उद्देशून लिहिलेला अपमानजनक मजकूर असतो, तर काही पोस्टमध्ये छायाचित्रांची मोडतोड (विद्रूपीकरण) करून नेत्यांना नको त्या स्थितीत दाखविण्यात आलेले असते. काही पोस्ट धार्मिक भावना दुखावू शकणाऱ्या असतात, तर काही अश्लील स्वरूपाच्या असतात’, असे गुप्तवार्ता विभागातील एका अधिकाऱ्याने सांगितले.
1 आक्षेपार्ह आॅनलाईन पोस्टमुळे राज्यात यापूर्वी दंगलसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. तशी स्थिती पुन्हा उद्भवू नये हा अशा पोस्ट ब्लॉक करण्यामागचा मुख्य हेतू आहे. आॅनलाईन वात्रटपणामुळे आम्हाला यापूर्वी दंगलीला सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे आम्ही आता अधिक काळजी घेत असून आॅनलाईन आक्षेपार्ह मजकुराची ओळख पटविण्यासाठी आम्ही आता शक्तिशाली चाळण्या लावल्या आहेत, असेही हा अधिकारी म्हणाला.
2 आक्षेपार्ह पोस्ट ब्लॉक करण्यात आल्या असल्या तरी त्यामागील खरे सूत्रधार हाती लागणे कठीण आहे. कारण, फेसबुक, टिष्ट्वटर आदी साईटवर फेक खाती वापरून असे प्रकार केले जातात.