७७ वर्षांचा विद्यार्थी देतोय दहावीची ४७ वी परीक्षा!
By admin | Published: March 5, 2016 02:40 AM2016-03-05T02:40:49+5:302016-03-05T02:40:49+5:30
७७ वर्षांचा एक राजस्थानी ‘विद्यार्थी’ इयत्ता दहावीची ४७ वी परीक्षा देण्यासाठी सज्ज झाला आहे. शिवचरण यादव असे या विद्यार्थ्याचे नाव आहे
अलवर/जयपूर : ७७ वर्षांचा एक राजस्थानी ‘विद्यार्थी’ इयत्ता दहावीची ४७ वी परीक्षा देण्यासाठी सज्ज झाला आहे. शिवचरण यादव असे या विद्यार्थ्याचे नाव आहे.
अलवर जिल्ह्याच्या खोहारी गावचा राहणारा शिवचरण याने सर्वप्रथम १९६८ मध्ये दहावीची परीक्षा दिली होती; परंतु या परीक्षेत तो नापास झाला होता. तेव्हापासूनच शिवचरण दरवर्षी दहावीच्या परीक्षेला बसतो आणि प्रत्येक वेळी एखाद्या विषयात पास तर दुसऱ्या कुठल्यातरी विषयात नापास होतो. याआधी त्याने ४६ वेळा दहावीची परीक्षा दिलेली आहे आणि प्रत्येकच वेळी तो नापास झाला आहे; परंतु त्याने जिद्द सोडली नाही.
शिवचरण अद्याप अविवाहित आहे. आपण दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाल्याशिवाय विवाह करणार नाही, अशी प्रतिज्ञा त्याने केली होती. त्यामुळे आता आपण दहावी पास करणारच असा त्याला विश्वास आहे.
येत्या १० मार्च रोजी त्याचा पहिला पेपर आहे. ‘यंदा मी अवश्य पास होणार’ असा विश्वास शिवचरणने व्यक्त केला. याआधी १९९५ मध्ये त्याची दहावीची परीक्षा पास होण्याची संधी थोडक्यात हुकली होती. त्याने गणित वगळता अन्य सर्व विषयांत चांगले गुण मिळविले. पण गणितात त्याला कमी गुण पडल्याने दहावी पास होण्याचे स्वप्नही भंगले. गेल्या वर्षी केवळ समाजशास्त्र या एकाच विषयात तो पास झाला. (वृत्तसंस्था)