यंदा लैंगिक अत्याचाराच्या सर्वाधिक ७८० तक्रारी- रेखा शर्मा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2018 11:49 PM2018-10-27T23:49:11+5:302018-10-27T23:49:31+5:30
राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांची माहिती; मीटू चळवळीमुळे जागृती
पुणे : विशाखा मार्गदर्शक तत्त्वानुसार तीन वर्षांपूर्वी ‘कामाच्या ठिकाणी महिलांचा होणारा लैंगिक छळ’ हा कायदा अस्तित्वात आल्यानंतर देशभरातून महिलांवरील लैंगिक अत्याचारासंदर्भात दरवर्षी जवळपास ५५० च्या आसपास तक्रारी राष्ट्रीय महिला आयोगाकडे येत होत्या. मात्र यंदाच्या वर्षी दहा महिन्यांतच आयोगाकडे सुमारे ७८० तक्रारी आल्या आहेत. यावर्षी तक्रारींचे प्रमाण २०० ने वाढले असल्याची माहिती राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
तीन वर्षांपूर्वी कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैंगिक छळाविरोधात तक्रार करण्यासाठी प्रत्येक कार्यालयामध्ये अंतर्गत तक्रार समिती कार्यान्वित करणे बंधनकारक आहे. मात्र आजही बºयाच कार्यालय आणि संस्थांमध्ये अशा अंतर्गत समित्या स्थापन करण्यात आलेल्या नाहीत. ही समिती स्थापन केलीच नसेल तर महिलांनी आवाज कुणाकडे उठवायचा, दाद कुणाकडे मागायची? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. याकरिताच आम्ही महिला व बालकल्याण विकास मंत्रालयाला ही सूचना केली आहे, की मंत्रालयासह प्रत्येक शासकीय, निमशासकीय, तसेच खासगी संस्था, कंपन्या यामध्ये अंतर्गत तक्रार समिती स्थापन करणे सक्तीचे करा. तसे झाल्यास महिलांना मोकळेपणाने आपले म्हणणे मांडता येईल आणि संबंधित व्यक्तीवर योग्य ती कारवाई केली जाईल.
सरकारी धोरणात कितीही बदल केला किंवा कायदे केले तरी जोपर्यंत समाजाचा महिलांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलत नाही तोपर्यंत धोरणांचा काहीही उपयोग नाही. कुटुंबामध्येच आईवडील मुलीच्या हातात बाहुली देतात आणि तिला लग्नाची स्वप्ने दाखविली जातात. पण लग्न ही खरंच इतकी महत्त्वाची गोष्ट आहे? तिला स्वत:च्या पायावर उभे केले तर हुंडाबळी किंवा कौटुंबिक हिंसाचारांसारख्या घटनांना तिला सामोरे जावे लागणार नाही. त्यामुळे ‘मीटू’ नव्हे, तर ‘नो मोअर,’ ‘आता बास’ असे म्हणण्याची वेळ असल्याचे त्या म्हणाल्या.
देशभरात ‘मीटू’ चळवळीने एक वादळ निर्माण केले आहे. पण ही चळवळ सुरू होण्याआधीही आयोगाकडे महिलांच्या तक्रारी येतच होत्या. कारण यापूर्वी कधी ना कधी प्रत्येकाबरोबर हे घडलं आहे. त्यामध्ये प्रत्येकाचा संघर्ष वेगळा आहे. त्यामुळे आज त्या बोलत आहेत असे म्हणता येणार नाही. ‘मीटू’ चळवळीनंतर महिलांना बोलायचे असेल किंवा तक्रार करायची असेल, तर आम्ही एक मेल आयडी जाहीर केला होता. त्यावर ज्या पूर्वीच सोशल मीडियावर व्यक्त झाल्या आहेत, अशा महिलांच्या आठ ते दहा तक्रारी राष्ट्रीय महिला आयोगाकडे आल्या असल्याचे त्यांनी सांगितले. - रेखा शर्मा