देशात पाच दिवसांत ७.८६ लाख लोकांनी घेतली लस, लसीकरणानंतर चौघांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2021 05:54 AM2021-01-21T05:54:12+5:302021-01-21T06:58:45+5:30
लसीकरणानंतर सहा राज्यांतील दहा लोकांमध्ये प्रतिकूल प्रतिक्रिया झाल्याचे दिसून आले. यापैकी ७ जणांना उपचारानंतर रुग्णालयातून सुटी देण्यात आली. अन्य तीन जण रुग्णालयात आहेत.
नवी दिल्ली : भारतात कोरोना लसीकरण मोहिमेच्या पाचव्या दिवशी, बुधवारी सायंकाळपर्यंत २० राज्यांतील ७,८६,८४२ आरोग्यसेवा कर्मचाऱ्यांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे. लसीकरणानंतर चार जणांचा मृत्यू झाला. दरम्यान, तीन लोकांच्या मृत्यूशी लसीचा काही संबंध नसल्याचे मृतदेहाच्या शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट झाले आहे. चौथ्या व्यक्तीच्या मृतदेहाच्या शवविच्छेदनानंतर त्याच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होईल, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव मनोहर अगनानी यांनी सांगितले.
लसीकरणानंतर सहा राज्यांतील दहा लोकांमध्ये प्रतिकूल प्रतिक्रिया झाल्याचे दिसून आले. यापैकी ७ जणांना उपचारानंतर रुग्णालयातून सुटी देण्यात आली. अन्य तीन जण रुग्णालयात आहेत. लसीकरणानंतर मृत्यू झालेल्यांत मुरादाबाद (उत्तर प्रदेश) , बेल्लारी, शिवमोगा (कर्नाटक) आणि निर्मल (तेलंगण) येथील प्रत्येकी एका व्यक्तीचा समावेश आहे.
कोविन ॲपमध्ये सुधारणा करण्यात आली आहे. एकाच नावाच्या व्यक्तींची ओळख त्यांच्या मोबाईल नंबरवरून पटविता येऊ शकते. पहिल्या डोसनंतर तात्पुरते आणि दुसऱ्या डोसनंतर लसीकरणाचे अंतिम डिजिटल प्रमाणपत्र दिले जाईल.
सर्व जिल्हाधिकारी, जिल्हा प्रतिक्षमन अधिकाऱ्यांना लसीकरणाबाबत दैनंदिन आढावा घेण्याचे आणि दिवसभरातील प्रगतीबाबत माहिती घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.