लाखो कर्मचाऱ्यांना नवीन वर्षाचं गिफ्ट, लवकरच मिळणार वाढीव वेतन...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2020 03:15 PM2020-01-13T15:15:27+5:302020-01-13T15:18:57+5:30
'कर्मचाऱ्यांना जानेवारी महिन्याच्या पगारात वाढीव महागाई भत्ता मिळणार आहे. '
अहमदाबाद : गुजरात सरकारने गेल्या काही दिवसांपूर्वी राज्यातील लाखो कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना खूशखबर दिली आहे. गेल्या बुधवारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या महागाई भत्त्यात (Dearness allowance) 5 टक्क्यांची वाढ केली आहे. म्हणजे आता 12 टक्क्यांऐवजी 17 टक्के महागाई भत्ता मिळणार आहे. ही वाढ 1 जुलै 2019 पासून लागू होणार आहे.
कर्मचाऱ्यांना जानेवारी महिन्याच्या पगारात वाढीव महागाई भत्ता मिळणार आहे. तर, संबंधित थकबाकी दोन किंवा तीन टप्प्यात दिली जाईल, असे राज्याचे उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांनी सांगितले. थकबाकीबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल. याशिवाय, महागाई भत्ता वाढीचा लाभ पंचायत कर्मचाऱ्यांना सुद्धा होणार आहे. तसेच, केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या महागाई भत्त्यानुसार हा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ केल्यानंतर राज्य सरकारच्या तिजोरीवर वार्षिक 1821 कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा पडणार आहे, असेही नितीन पटेल यांनी सांगितले.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी सातव्या वेतन आयोगानुसार, केंद्रीय कर्माचाऱ्यांचा महागाई भत्ता 12 वरून 17 टक्के करण्यात आला होता. याआधी गुजरात सरकारने गेल्या वर्षी जून महिन्यात आपल्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 3 टक्क्यांची वाढ केली होती. ही वाढ जानेवारी 2018 पासून लागू झाली होती. यामुळे सरकारच्या तिजोरीवर वार्षिक 1071 कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा वाढला होता.
दुसरीकडे, महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना पाच टक्के वाढीव महागाई भत्ता देण्याचा निर्णय गेल्या काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने घेतला आहे. महाराष्ट्रातील सरकारी कर्मचाऱ्यांना हा महागाई भत्ता आता 12 टक्क्यांवरून 17 टक्के इतका करण्यात आला आहे. ही वाढ 1 डिसेंबर 2019 पासून रोखीने देण्यात येईल. वाढ 1 जुलै 2019 पासून लागू केली असली तरी जुलै ते नोव्हेंबरपर्यंतची थकबाकी देण्याबाबत स्वतंत्रपणे निर्णय घेण्यात येईल, असे सरकारने आदेशात म्हटले आहे.
(राज्य कर्मचाऱ्यांना मिळणार ५ टक्के वाढीव महागाई भत्ता)
(पोस्टातील खातेदारांसाठी मोठी बातमी, 'एवढी' रक्कम काढताना भरावा लागेल TDS)
(OYOनंतर आता वॉलमार्ट करणार कर्मचाऱ्यांची कपात, 100हून जणांच्या नोकऱ्या धोक्यात)