८ चित्त्यांचा १३९ बिबटे, १०० अस्वलांशी शिकारीसाठी संघर्ष होण्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2022 06:14 AM2022-09-16T06:14:08+5:302022-09-16T06:14:24+5:30
कुनो अभयारण्यातील जैवसाखळीत होणार मोठे बदल
नवी दिल्ली : भारतात दाखल होणाऱ्या आठ चित्त्यांना मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात शनिवारी, १७ सप्टेंबर रोजी सोडण्यात येणार आहे. तिथे या चित्त्यांना १३९ बिबटे, १०० अस्वले यांच्यासोबत सहजीवन जगावे लागणार आहे. चित्ते हे नवे प्राणी या राष्ट्रीय उद्यानात आल्याने बाकीच्या प्राण्यांसाठीही तेथील जैवसाखळीतला मोठा बदल असेल. त्यामुळे या प्राण्यांमध्ये शिकारीवरूनही काही प्रमाणात संघर्ष होण्याची शक्यता आहे.
चित्ते हे बिबट्यांप्रमाणेच मार्जारकुळातील प्राणी आहेत. मात्र, चित्ते बिबट्यांपेक्षा अधिक चपळ व शक्तिशाली असतात. जंगलामध्ये शक्तिशाली प्राण्यांचेच वर्चस्व प्रस्थापित होते. त्यामुळे चित्ते आल्यानंतर तेथील बिबट्यांचे अस्तित्व धोक्यात येणार नाही ना अशी चिंता काही वन्यजीव तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. बिबटे व चित्ते यांची शिकार करण्याचा पद्धत वेगळी आहे. बिबट्या आपली शिकार झाडावर घेऊन जातो. तसे चित्त्याला करता येत नाही, पण शिकार मिळविताना कदाचित चित्ता व बिबट्यामध्ये काही प्रमाणात संघर्ष होऊ शकतो.
चित्ता करतो वेगाने शिकार
चित्ता हा आपली शिकार केल्यानंतर ती संपूर्ण फस्त केल्याशिवाय जागेवरून हालत नाही. चित्ता अतिशय वेगाने धावतो व अवघ्या २० सेकंदात आपल्या भक्ष्याची शिकार करतो.
जंगलात पुरेसे खाद्य
बिबट्यांबरोबरच अस्वलांचीही येथे मोठी संख्या आहे. अस्वले शक्यतो चित्त्यांशी संघर्ष करणार नाहीत. मात्र, अस्वलांच्या पिल्लांवर चित्त्यांनी हल्ला केल्यास हा संघर्ष अटळ आहे. कुनो राष्ट्रीय उद्यानात नीलगाय, सांबर, हरीण, चितळ इत्यादी प्राणी आहेत.