हल्ल्याला ८ दिवस झाले, दहशतवादी सापडेनात; सीमेपलीकडून आणखी घुसखोरीची शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2023 05:35 AM2023-12-29T05:35:01+5:302023-12-29T05:36:44+5:30
काही हजार जवान दहशतवाद्यांच्या शोधमोहिमेत सहभागी झाले आहेत.
सुरेश डुग्गर, लोकमत न्यूज नेटवर्क, जम्मू : आठ दिवसांपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये डेरा की गली या भागात दहशतवादी हल्ल्यात चार लष्करी जवान शहीद झाले होते. या हल्ल्यात आठ दहशतवादी सामील असल्याचा तपास यंत्रणांचा कयास आहे. या दहशतवाद्यांना पकडण्यात अद्याप यश आलेले नाही.
काही हजार जवान दहशतवाद्यांच्या शोधमोहिमेत सहभागी झाले आहेत. राजौरी, पुंछ या जिल्ह्यांमध्ये दहशतवाद्यांच्या वाढलेल्या कारवायांचा बीमोड करण्यासाठी लष्कराची आणखी एक ब्रिगेड या भागात आणण्यात आली आहे. या दोन जिल्ह्यांत असलेल्या गुहांमध्ये दहशतवादी राहत असल्याचा दावा करण्यात येत आहे.
जम्मू-काश्मीरच्या राजौरी, पुंछ जिल्ह्यात नियंत्रण रेषेला लागून असलेल्या भागात मोठ्या प्रमाणावर हिमवृष्टी झाली नसल्याने सीमेपलीकडून अजूनही घुसखोरी होण्याची शक्यता आहे.