मणिपूर हिंसाचारात ८ ठार, ३१ जखमी
By admin | Published: September 1, 2015 11:17 PM2015-09-01T23:17:23+5:302015-09-02T00:11:25+5:30
मणिपूर विधानसभेत सोमवारी काही वादग्रस्त विधेयके मंजूर झाल्यानंतर चुडाचंदपूर जिल्ह्यात भडकलेला हिंसाचार आणि पोलिसांच्या गोळीबारात ८ जण ठार तर ३१जखमी झाले
इम्फाल : मणिपूर विधानसभेत सोमवारी काही वादग्रस्त विधेयके मंजूर झाल्यानंतर चुडाचंदपूर जिल्ह्यात भडकलेला हिंसाचार आणि पोलिसांच्या गोळीबारात ८ जण ठार तर ३१जखमी झाले. या घटनेमुळे शहरात बेमुदत संचारबंदी लागू करण्यात आली. दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी मंगळवारी मुख्यमंत्री ओ. इबोबी सिंग यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा केली आणि केंद्रातर्फे सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले.
राज्यात मोठ्या प्रमाणात हिंसाचार उफाळून आला असून, राज्य सरकारमधील एक मंत्री, खासदार आणि पाच आमदारांच्या घरांना अज्ञात लोकांनी आग लावली. चुडाचंदपूर शहरात मंगळवारी तीन मृतदेह आढळले. त्यांना गोळ्या घालण्यात आल्या होत्या. तर हेंगलपचे आमदार मंगा वेईफेई यांच्या निवासस्थानाच्या मलब्यातून एक जळलेला मृतदेह बाहेर काढण्यात आला, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्याने दिली. मणिपुरातील मूळ रहिवाशांना संरक्षण देण्यासाठी विधानसभेत तीन विधेयके पारित करण्यात आली होती. त्यानंतर काही तासातच हिंसाचाराचा उद्रेक झाला. मंगळवारी सायंकाळी संतप्त जमावाने चुडाचंदपूर पोलीस ठाण्यावर हल्ला केला. यावेळी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात तीन जण ठार तर चार लोक जखमी झाले. मृतांमध्ये एका १० वर्षीय मुलाचा समावेश आहे. पाच जणांचा मृत्यू बंदकाळातील हिंसाचारात झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाह्य मणिपूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार थांगसो बेत, राज्याचे कुटुंबकल्याण मंत्री फुंगजांगफांग तोनसीम आणि थानलोमचे वुनगजागीन यांच्यासह पाच आमदारांची घरे जाळण्यात आली.
घराची जाळपोळ करताना गंभीर जखमी झालेल्या एका हल्लेखोरास रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. (वृत्तसंस्था)