चालत ८ महिन्यांनी कोर्टापुढे येणे अमान्य!
By admin | Published: October 22, 2015 03:47 AM2015-10-22T03:47:09+5:302015-10-22T03:47:09+5:30
आपण कोलकत्याहून अहमदाबादला चालत येणार असल्याने न्यायालयापुढे हजर होण्यासाठी आपल्याला आठ महिन्यांची मुदत मिळावी ही श्वेतांबर जैन पंथाच्या एका मुनीने
अहमदाबाद : आपण कोलकत्याहून अहमदाबादला चालत येणार असल्याने न्यायालयापुढे हजर होण्यासाठी आपल्याला आठ महिन्यांची मुदत मिळावी ही श्वेतांबर जैन पंथाच्या एका मुनीने केलेली विनंती अमान्य करून येथील न्यायालयाने या मुनींविरुद्ध ४ नोव्हेंबर रोजी हजर होण्यासाठी वॉरन्ट काढले आहे.
जस्मिन शहा नावाच्या जैन समाजातील एका व्यक्तीने या समाजात प्रचलित असलेल्या ‘बाल दीक्षा’ प्रथेविरुद्ध दंडाधिकारी न्यायालयात फौजदारी फिर्याद दाखल केली आहे. त्यासंदर्भात त्यांनी आचार्य कीर्ति यशुरिश्वरजी महाराज यांनाही फिर्यादीत आरोपी केले आहे. न्यायालयाने याआधी या मुनींविरुद्ध न्यायालयात हजेरीसाठी समन्स काढले होते. परंतु ते हजर झाले नाहीत. त्यांच्या वकिलाने मुदत मागताना न्यायालयाला सांगितले की, आचार्य कीर्ति यशुरिश्वरजी महाराज कठोर धर्मपालन करीत असल्याने ते कोणत्याही वाहनाने प्रवास करीत नाहीत. त्यामुळे कोलकात्याहून येण्यास त्यांना किमान आठ महिन्यांचा वेळ लागेल. (वृत्तसंस्था)